
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाल्याने जात पडताळणी समितीने ते रद्द केल्याचा निर्णय आज दिला. या निर्णयामुळे खासदार जयसिद्धेश्वर यांची खासदारकी आणि राजकीय भवितव्य धोक्यात आले असून सोलापुरात पुन्हा पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे.
महास्वामी यांनी दिलेल्या बेडा जंगम जात प्रमाणपत्राच्या वैधताबाबत गेल्या आठवडय़ात अंतिम सुनावणी झाली होती. समितीच्या सदस्यांनी कायद्याचा अभ्यास करून दक्षता पथकाच्या अहवालाचा आधार घेतला. त्यानुसार डॉ. महास्वामी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे, असे समितीने दिलेल्या निकालपत्रात म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, बहुजन वंचित आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांचा पराभव करून डॉ. महास्वामी हे विजयी झाले होते. त्यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांनी केली होती. त्यावर डॉ. महास्वामी यांनी जात वैधता पडताळणी समितीकडे अपील केले होते. जात पडताळणी समितीने डॉ. महास्वामी यांनी जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी दक्षता समिती नियुक्ती केली. या समितीने ठिकठिकाणी जाऊन कागदपत्रांबाबत माहिती घेतली. त्यातून डॉ. महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार जात पडताळणी समितीने जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे जात पडताळणी समितीच्या या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.































































