
बोरामणीजवळील हिरजे वस्तीवर वृद्धाचा खून करून 75 हजार रुपयांचे दागिने लुटून नेणाऱया ऊसतोड मजुरांच्या टोळीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. हे ऊसतोड मजूर अट्टल गुन्हेगार आहेत. सहाजणांना पोलिसांनी अटक केली असून, दोघे अद्याप फरार आहेत.
वैभव उर्फ भोरडय़ा एकनाथ काळे, संतोष झोडगे, अजय देवगण उर्फ देवगण सपा शिंदे, सुनील उर्फ सपा शिंदे, ज्ञानेश्वर लिंगू काळे, विकास नागेश काळे अशी अटक केलेल्यांची, तर अक्षय काळे, अनुज उर्फ भय्या नागनाथ भोसले हे फरार आहेत. या दरोडेखोरांच्या हल्ल्यात बाबूराव हिरजे या वृद्धाचा मृत्यू झाला आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावाजवळ बाबूराव सोमनाथ हिरजे, पत्नी सुलोचना हिरजे व मुलगा सोमनाथ हिरजे राहतात. घटनेच्या दिवशी पहाटे 2 च्या सुमारास सात ते आठ जणांच्या टोळीने सशस्त्र्ा दरोडा टाकून 75 हजार रुपयांचे दागिने व रोकड लुटून नेले होते. यावेळी प्रतिकार करणाऱया बाबूराव हिरजे यांना डोक्यात कुऱहाड घालून ठार मारण्यात आले. याप्रकरणी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या दरोडय़ातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी बक्षीसही जाहीर केले होते. तपासादरम्यान आरोपी धाराशिव जिल्हय़ातील असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून जवळा जामखेड, वाडवान बीड, लोणी काळभोर येथून सहाजणांना अटक केली. त्यांचे आणखी दोन साथीदार फरार आहेत. अटकेतील आरोपींनी गुन्हय़ाची कबुली दिली आहे.
दरम्यान, ही टोळी अट्टल गुन्हेगार असून, वाशी, जामखेड, आंबी, नेकनूर या पोलीस स्टेशनमध्ये 12 गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. ही टोळी बोरामणी गावाजवळ ऊसतोडसाठी काही महिन्यांपूर्वी आली होती. त्यावेळी त्यांनी दरोडय़ासाठी रेकी केली होती. त्यावेळेला दरोडय़ाचा प्लॅन फसला. त्यानंतर त्यांनी धाराशिव येथील हिरजेवस्तीवर दरोडा घातल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती तपास करीत आहेत.






























































