सोलापूरातील बालकांची आरोग्य पत्रिका तयार, 10 जून ते 10 जुलैदरम्यान होणार तपासणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या तिसऱया लाटेत मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा परिषदेने नियोजन केले असून, जिल्ह्यातील बालकांची आरोग्य पत्रिका तयार करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्यक्ष तपासणीस 10 जूनपासून सुरुवात होणार असून, 10 जुलैपर्यंत ग्रामीण भागातील 1 लाख 77 हजार 932 बालकांची रक्त, हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

या मोहिमेंतर्गत 4 जून रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात तालुकास्तरीय अधिकाऱयांना मार्गदर्शनासाठी तज्ञ बालरोगतज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण घेतलेल्या तालुकास्तरीय वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याकडून 5 ते 9 जून या कालावधीत ग्रामस्तरीय अंमलबजावणी यंत्रणेस प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या उपक्रमात शाळा, अंगणवाडी, महाविद्यालयातील  18 वर्षांच्या आतील मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी गावपातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्रांतील डॉक्टर, आरोग्य सेवक, आरोग्यसेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व शिक्षकांचे योगदान घेण्यात येणार आहे.

रक्त, लघवी आदी तपासणीत दोष असलेल्या मुलांना तातडीने उपचार देण्यात येणार आहेत. गरज असेल अशा बालकांना पंढरपूर येथील बाल कोविड रुग्णालयात दाखल करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य खात्याने मोहीम काळात दैनंदिन अहवाल सादर करावा, असेही आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.