सोलापूर शहराला पुन्हा पावसाने झोडपले, एकरुख तलाव भरले; सात उपनगरांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

शहरात सायंकाळी तासभर पुन्हा पावसाने झोडपले. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. रात्री पावसाची संततधार चालूच होती. यामुळे शहराच्या लगतचा एकरुख तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांना हलविण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा शहराजवळील एकरुख तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. हवामान विभागाने पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला असून, तलावातील पाण्याची पातळी वाढल्यास 400 क्युसेक्सने विसर्ग करण्यात येणार आहे. या विसर्गामुळे शहरातील अंवतीनगर, अभिमानश्रीनगर, वसंत विहार, यशनगर, गायत्रीनगर, गणेशनगर, भडकीवस्तीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, महापालिकेनेही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या परिसरातील कुटुंबांना हलविण्याचे नियोजन केले आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून नये, असे आवाहनही करण्यात आले असून, पालिका आपत्तीव्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या