तुफान पावसाने सोलापूर जिल्ह्याला झोडपले, हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान

सोलापूर शहर व जिल्ह्यात शनिवारी रात्री पावसाने झोडपल्यामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकतानगर येथे पावसाच्या पाण्यात एका इसमाचा मृतदेह आढळला असून, बहिहिप्परगा येथे बैलगाडी वाहून गेल्याने दोन बैलांचा मृत्यू झाला आहे. नाले व ओढे भरून वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटला असून, शेतीबरोबरच अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.

शनिवारी रात्री जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले. यामुळे शहरातील रस्ते तुडुंब भरून वाहत होते. नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्याने अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरली होती. दरम्यान, एकतानगर पोलीस कॉलनीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास वाहत्या पाण्यामध्ये एका इसमाचा मृतदेह आढळला. आधार कार्डवरून त्याची ओळख पटली असून, श्रीनिवास अंबादास माने असे त्याचे नाव आहे. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हा मृतदेह पाठविण्यात आला आहे.

दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, अक्कलकोट या तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळल्यामुळे ओढे-नाले भरून वाहत आहेत. अनेक गावांलगतच्या पुलावरून मोठय़ा प्रमाणावर पाणी वाहत असल्यामुळे गावांचा संपर्कही तुटला आहे. बहिहिप्परगा येथे बाबासाहेब माने यांची बैलगाडी वाहून गेल्यामुळे दोन बैलांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथे विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाल्याने ओढे व तलाव भरले आहेत. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने प्रापंचिक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव, वडजी आदी गावांचे दोन दिवसांपासून संपर्क तुटला आहे. बार्शी, अक्कलकोट तालुक्यातही ओढे-नाले भरून वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटल्याचे वृत्त आहे. या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मका, तूर आदी खरीप पिकांना जबर फटका बसला असून, नदी व ओढय़ाकाठी असलेल्या अनेकांच्या शेतातून पिके वाहून गेली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून रात्री कोसळणाऱया या पावसामुळे अनेकांना रात्र जागून काढावी लागली. या पावसाच्या तडाख्यामुळे पंचनामे लवकर करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ, मंगळवेढा तालुक्यात शंभर टक्केहून अधिक पाऊस झाला आहे.

शेवगाव तालुक्यात पुन्हा ढगफुटीसदृश्य पाऊस

शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात दुसऱयांदा शनिवारी रात्री पुन्हा जोरदारपणे ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहून आलेल्या पुरामुळे खरीप हंगामागील उरलेसुरले कापूस, बाजरी, तूर व उभे ऊस पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे.

शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील बोधेगाव, बालमटाकळी,चापडगाव, हातगाव, कांबी, हसनापूर, शिंगोरी, नागलवाडी, गोळेगाव, लाडजळगाव आदी भागांत शनिवारी रात्री ढगफुटीसदृश्य पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्रभर व रविवारी पहाटेपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. तालुक्यातील खरीप हंगामातील पिके कमी-अधिक पावसामुळे जोरात आली होती. मात्र, गेल्या महिन्यापासून वादळी वाऱयासह सततच्या जोराच्या पावसामुळे मुख्य असलेले कापूस, बाजरी, उडीद, सोयाबीन, तूर व शेतात उभे असलेले ऊस पीक पूर्णपणे भुईसपाट झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या