
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच दिवसेंदिवस रुग्णांचा आलेखही उंचावू लागला आहे. अशा परिस्थितीत शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, त्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. शाळा सुरू करायच्या की नाही, याबाबतचा निर्णय मंगळवारी होणाऱया बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या सहा हजारांपर्यंत शाळा (शासकीय व खासगी) असून, त्यामध्ये जवळपास सहा लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. कोरोनामुळे मार्च 2020 पासून दोन महिन्यांपर्यंत कधीच सलग शाळा सुरू राहिल्या नाहीत. पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांचीच तर शाळा काही दिवसांसाठीच उघडली. त्या मुलांच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम झाला असून, आता बोर्डाच्या परीक्षेपूर्वी दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचे खासगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याची गरज असतानाही ते बंदच आहेत.
त्यामुळे जिल्ह्यातील विशेषतः कोरोनामुक्त, कोरोनाचे रुग्ण खूपच कमी असलेल्या गावांतील शाळा नियमांचे पालन करून सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यासंबंधीचा निर्णय पालकमंत्री भरणे हे मंगळवारी घेणार आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त ते सोलापूर दौऱयावर येत आहेत. मात्र, कोरोना रुग्णांच्या स्थितीचा आढावा घेऊनच त्यासंबंधीचा निर्णय होऊ शकतो. या बैठकीत शहरातील शाळांबाबतीतसुद्धा निर्णय होऊ शकतो, असेही जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले.
ग्रामीण भागातील मुलांची गुणवत्ता राखण्यासाठी पालकांच्या मतांनुसार सर्वच शाळा सुरू करण्यासंबंधीचा सकारात्मक प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे पाठविला आहे. मंगळवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम निर्णय होईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.




























































