अखेर कोरोनाचा माढा परिसरात शिरकाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माढा तालुक्यातील दारफळ सीनायेथील पोलीस कर्मचाऱ्याचा आज सकाळी कोरोना बाधित असलेला अहवाल आल्याने गावात एकच खळबळ उडाली. या अहवालानंतर आरोग्य व महसूल प्रशासन सतर्क झाले आहे. तहसीलदार राजेश चव्हाण यांनी गावास भेट दिल्यानतंर दारफळ हे गाव ताबडतोब सील करण्यात आले.

दारफळ सीना गावातील पोलीस कर्मचारी पांगरी (ता बार्शी) या ठिकाणी सेवेत कार्यरत होता. तो पांगरी ते दारफळ दरम्यान नोकरीनिमित्ताने येजा करीत असे. गेल्या चार दिवसांपूर्वी त्याला त्रास जाणवू लागल्याने त्याचा स्वॅब घेण्यात आला. त्याच्या आज सकाळी आलेल्या अहवालात तो बाधित असल्याचं नमूद करण्यात आलं होतं.

या अहवालामुळे गावांत एकच खळबळ उडाली असून त्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील व इतर व्यक्तीना आरोग्य विभागाने तपासणीस पाठविले आहे असे आरोग्य अधिकारी डॉ पलंगे यांनी सांगितले. धक्कादायक माहिती अशी की, त्याच्या घरी भाजीपाला विक्री केली जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची संख्या वाढण्याची शक्यता आहे.