
ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा दि. 12 ते 16 जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहे. यंदाच्या यात्रेत 300 ड्रोन लाईटच्या साहाय्याने बालशिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचे जीवनचरित्र साकारण्यात येणार आहे, अशी माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दिली.
सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला 900 वर्षांची परंपरा असून, 12 ते 16 जानेवारी या पाच दिवसांत संपन्न होणाऱया धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दिली.
सोमवारी (दि. 12) यण्णीमज्जन (68 लिंग तैलाभिषेक), 13 जानेवारी रोजी सम्मतीभोगी (सम्मतीकट्टय़ावर अक्षता समारंभ), 14 जानेवारी होम मैदानावर होम प्रदिपन समारंभ, 15 जानेवारी शोभेचे दारुकाम आणि 16 जानेवारी रोजी कप्पडकळीने (नंदीध्वजाचे वस्त्र्ा विसर्जन) यात्रेतील धार्मिक विधींची सांगता होणार असल्याचे काडादी यांनी सांगितले.
या यात्रेनिमित्त होम मैदान व मंदिर परिसरात गड्डा यात्रा भरणार असून, यात विविध प्रकारचे 250हून अधिक स्टॉल उभारण्यात आले आहेत. यात्रा कालावधीत विजापूर रोडवरील ए. जी. पाटील कॉलेजजवळ पशुप्रदर्शन व विक्रीचे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे 20 एकर परिसरात हे पशुप्रदर्शन भरविण्यात आले असून, महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातून शेतकरी या प्रदर्शनाला भर देतात.
कला फाऊंडेशनच्या वतीने नंदीध्वज मिरवणूक मार्गावर रांगोळीच्या भव्य पायघडय़ा घालण्यात येणार आहेत. यंदाच्या यात्रेचे वैशिष्टय़ म्हणजे 15 जानेवारी रोजी शोभेच्या दारुकामदरम्यान भव्य ‘ड्रोन लाईट शो’चे आयोजन करण्यात आले आहे. हैदराबाद येथील कंपनीने सुमारे 300 ड्रोन लाईटच्या माध्यमातून श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या दिव्य जीवन कार्यावर आधारित देखावे साकारणार आहेत. परंपरेनुसार 31 जानेवारीपर्यंत सोलापूरची गड्डा यात्रा संपन्न होणार असल्याचे काडादी यांनी सांगितले.
या यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवस्थानकडून शिवशरणी गुरुदेवी महिला वृद्धाश्रम आणि श्री सिद्धेश्वर अध्यात्मिक ग्रंथालय सुरू करण्यात येणार असल्याचे काडादी यांनी सांगितले. तसेच सोलापूर विद्यापीठात श्री गुरू मल्लिकार्जुन व श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यावेळी सिद्धेश्वर बमणी, नीलकंठप्पा कोनापुरे, बाळासाहेब भोगडे, ऍड. मिलिंद थोबडे, डॉ. राजेंद्र घुली, गिरीश गोरनळ्ळी, विश्वनाथ लब्बा, शरणराज काडादी, विलास कारभारी यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते.
36 सीसीटीव्ही कॅमेऱयांची नजर
या यात्रेनिमित्त श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने 36 कॅमेरे बसविण्यात आले असून, या यात्रा कालावधीकरिता सुमारे एक कोटी रुपयांचा अपघाती विमा उतरविण्यात आला आहे. अक्षता सोहळ्याचे दूरचित्र वाहिनीवरून थेट प्रक्षेपण होणार असून, सोलापूर आकाशवाणी केंद्रावरून अक्षता सोहळ्याचे विशेष धावते वर्णन करण्यात येणार आहे.
ग्रामदैवत श्रीशिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला आजपासून प्रारंभ होत आहे. पंचक्रोशीतील 68 लिंगांना नंदीध्वजांच्या मिरवणुकीने तैलाभिषेक होणार आहे. या तैलाभिषेकासाठी कुंभार समाजाकडून परंपरेप्रमाणे मातीच्या घागरी देण्यात आल्या आहेत. मध्यरात्री कसब्यातील हिरेहब्बू वाडय़ात मानाच्या पहिल्या व दुसऱया नंदीध्वजांना साज चढविण्याचा सोहळा संपन्न झाला. सोमवारी सकाळी हिरेहब्बू वाडय़ात दोन नंदीध्वजांची पुजारी व मानकऱयांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर पालखीसह सातही नंदीध्वज तैलाभिषेकासाठी मार्गस्थ होतील. कुंभारवाडा, बाबा कादरी मशिद, दाते गणपती, दत्त चौक, सोन्या मारूती, माणिक चौक, विजापूर वेसमार्गे पंचकटय़ाजवळ आल्यानंतर परंपरेनुसार पुजारी हिरेहब्बू शासकीय आहेर स्वीकारतील. त्यानंतर नंदीध्वज मिरवणुकीने मंदिरात दाखल होणार आहेत. मंदिरातील योगसमाधी आणि मुख्य गाभाऱयातील मूर्तींची पूजा आणि आरती सोहळा संपन्न होणार आहे. शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी पंचक्रोशीतील अष्टदिशांमध्ये 68 लिंगांची प्रतिष्ठापना केली आहे. या 68 लिंगांना तैलाभिषेक करून यात्रेला प्रारंभ होतो. रात्री उशिरापर्यंत हा तैलाभिषेक सोहळा चालणार आहे.






























































