
सोलापूर येथील चित्रकार प्रतीक तांदळे व त्याच्या सहकाऱयांनी तब्बल अर्ध्या एकर भुईमुगाच्या शेतामध्ये भव्य अशी श्री गणरायाची प्रतिकृती साकारली आहे.
गणेशभक्त असलेला चित्रकार प्रतीक व त्याच्या सहकाऱयांनी यापूर्वी विविध चित्र साकारली आहेत. सोलापूर-पुणे महार्गावरील बाळे टोळनाका परिसरात ही श्री गणरायाची प्रतिकृती साकारली असून, 5 जुलै ते 29 ऑगस्ट या कालावधीत हे काम पूर्ण झाले आहे. याकरिता भुईमूग पीक वापरण्यात आले आहे.
जवळपास 150 फूट लांबी व 100 फूट रुंदी असून, ही प्रतिमा साकारण्यासाठी 45 दिवस लागले आहेत. प्रतीकबरोबर गौरव शिंदे, अभिषेक बोरकर, समर्थ जोशी, अभिजित राजूर यांनी प्रतिकृती साकारण्यासाठी साहाय्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती यापूर्वी त्यांनी कडब्यातून साकारली होती. गणेशाची प्रतिकृती पाहण्यासाठी शहर व परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने येत आहेत.























































