वरिष्ठांच्या नावाने मागितली पाच लाखांची लाच सोलापूर ‘समाजकल्याण’च्या दोन शिपायांवर गुन्हा दाखल

सोलापूर आश्रमशाळेतील शिक्षिकेचे प्रलंबित वेतन काढण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱयांच्या नावाने पाच लाखांची लाच मागणाऱया सोलापूर समाजकल्याण विभागातील दोन शिपायांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. यातील एकाला अटक करण्यात आली असून, एकजण फरार झाला आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

अशोक गेमू जाधव (रा. शिमलानगर, विजापूर रोड, सोलापूर) याला अटक करण्यात आली असून, किसन मारुती भोसले (रा. वैष्णवी हाईट्स, कर्वेनगर, पुणे) हा फरार झाला आहे.

एका आश्रमशाळेतील शिक्षिकेचे प्रलंबित वेतन काढण्यासाठी समाजकल्याण विभागातील शिपाई किसन भोसले आणि प्राथमिक आश्रमशाळा बसवनगर मंद्रूप येथील शिपाई अशोक जाधव यांनी वरिष्ठ अधिकाऱयांची ओळख असल्याचे सांगून पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. या शिक्षिकेच्या पतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या दोन्ही शिपायांनी एका हॉटेलमध्ये तक्रारदाराला लाचेची रक्कम देण्यासाठी बोलाविले होते. चर्चेदरम्यान शिपायांनी लाच मागितल्याची खात्री होताच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी झडप घालून अशोक जाधव याला पकडले, तर किसन भोसले हा पोलिसांना चकवा देत पळून गेला आहे. विजापूरनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अशोक जाधव हा एका वरिष्ठ अधिकाऱयाचा चालक असल्याची माहिती पुढे आली आहे.