
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर मनपा आयुक्तांनी सोमवारपासून शहराकरिता नवे निर्बंध लागू केले आहेत. आयुक्त पी. शिवशंकर यांनी याबाबत काढलेल्या आदेशाची सोमवार सकाळपासूनच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
राज्यात ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’चे रुग्ण आढळल्यानंतर व कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनेच्या अनुषंगाने सोलापूर महापालिका क्षेत्रात नव्याने निर्बंध लागू करण्याचे निर्देश प्राप्त झाले होते. त्यानुसार मनपा आयुक्तांनी सोमवारपासून सुधारित आदेश लागू केले आहेत. सोमवार ते रविवारपर्यंत सकाळी 7 ते दुपारी 4पर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. इतर सेवा दुकाने, आस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4पर्यंत सुरू राहणार असून, शनिवार व रविवार पूर्णपणे बंद राहतील.
शहरात संध्याकाळी 5पर्यंत जमावबंदी व 5नंतर संचारबंदी लागू राहणार आहे. सकाळी 5 ते 9पर्यंत मैदान व सार्वजनिक ठिकाणे खुली राहणार असून, हॉटेल सेवा 50 टक्के क्षमतेने दुपारी चारपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवार फक्त पार्सल सेवा राहील. विवाह सोहळ्यात 50 व्यक्तींना, तर अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. मालवाहतूक नियमित राहणार असून, त्यामध्ये जास्तीत जास्त तिघांना परवानगी देण्यात आली आहे. उत्पादनक्षेत्र नियमित सुरू राहील; तर उत्पादन, अत्यावश्यक प्रक्रिया उद्योग 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.


























































