
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याचे शासनाचे आदेश असून, 85 टक्क्यांवर थांबलेली लसीकरणाची गाडी लवकरात लवकर शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान सोलापूर महापालिका प्रशासनासमोर आहे.
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत 85 टक्के नागरिकांनी पहिली, तर 57 टक्के नागरिकांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. जवळपास तीन हजार व्यक्तींना बूस्टर डोस देण्यात आला आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शहरातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये तसेच नगरसेवकांच्या शिफारशीने सुरू केलेल्या लसीकरण केंद्रांवर लसीच्या पुरेशा मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय घरापर्यंत लस देण्याचीही सोय करण्यात आली आहे.
सध्या कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. त्याला रोखण्यासाठी उर्वरित नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. मध्यंतरी लसीकरणाच्या दोन मात्रा घेतलेल्या नागरिकांनाच सुविधा देण्याचा निर्णय घेतला होता. शासकीय कार्यालयात याबाबतची सक्ती करण्यात आली आहे. लसी घेतलेले प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय वेतन देण्यात येत नव्हते.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गेल्या आठवडय़ात आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महिला बचत गटाच्या मदतीने लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्याचे नियोजन केले आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, लसीकरण विभागाच्या समन्वयिका डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी उर्वरित नागरिकांना लस देण्याचे नियोजन केले आहे.
तिसऱ्या लाटेत लक्षणे सौम्य आहेत म्हणून नागरिक कोरोनाची चाचणी करून घेत नाहीत, असे आढळले आहे. रुग्ण डॉक्टरांकडे जातात आणि सर्दी खोकल्यावरचे औषध घेऊन घरी राहतात, असे करणे धोकादायक आहे. कारण हे रुग्ण कोरोनाचे वाहक असू शकतात. त्यामुळे अशा रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आदेश रुग्णालयांना देण्यात आले आहेत, असे लसीकरण विभागाच्या समन्वयिका डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी सांगितले.






























































