सोलापूर महापालिकेच्या सभेत नगरसेवकांना प्रवेशबंदी, आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी आलेल्या नगरसेवकांना प्रवेशद्वारावरच अडवून आत जाण्यास मनाई केल्याने पालिका परिसरात आज वातावरण तणावपूर्ण बनले होते. दरम्यान, काही नगरसेवकांनी ऑनलाइन सभा सुरू असताना महापौर व आयुक्तांचा निषेध करीत आंदोलन केले. त्यामुळे पालिका आवारात गोंधळ उडाला होता. आंदोलनादरम्यान गुन्हेगारासारखी वागणूक मिळाल्याने ‘आम्हाला अटक करा; पण सभा ऑफलाइनच घ्या’ म्हणत आयुक्तांच्या कार्यालयात नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केले.

सोलापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा आज महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले सभागृहात ऑनलाइन पद्धतीने पार पडली. ऑनलाइन सभेला नगरसेवकांचा विरोध आहे. ऑनलाइन सभा सुरू असताना ज्येष्ठ नगरसेवक यू. एन. बेरिया, बाबा मिस्त्र्ााr, तौफिक शेख, गणेश पुजारी, नगरसेविका वाहिदा शेख, शाजिदा बानो शेख हे महापौरांना भेटून सभा ऑफलाइन पद्धतीने घ्यावी, या मागणीसाठी पालिका परिसरात आले होते. या नगरसेवकांना सुरक्षेचे कारण देत अडविण्यात आले व पालिकेत येण्यासाठी मज्जाव केला. गुन्हेगारासारखी वागणूक दिल्याने संतप्त झालेल्या या नगरसेवकांनी घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. ‘आम्हाला अटक करा किंवा वॉरंट काढा; पण सर्वसाधारण सभा ऑफलाइनच झाली पाहिजे’ अशी मागणी करत सावित्रीबाई फुले सभागृहासमोर ठिय्या मांडला होता. नगरसेवकांच्या घोषणाबाजीने सभेतही गोंधळ उडाला होता.

या सभेसाठी विरोधी पक्षनेता अमोल शिंदे, गटनेते चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, सभागृहनेते शिवानंद पाटील यांच्यासह सर्व पक्षाचे गटनेते उपस्थित होते.

अडवणुकीसाठीच ऑनलाइन सभा

n या नगरसेवकांनी पालिका आयुक्त शिवशंकर यांच्याकडेही निषेध नोंदवून सभा नियोजन भवनात किंवा हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये घेण्याबाबत नियोजन करावे, अशी मागणी केली. नियोजन समितीसह अनेक समित्यांच्या सभा होत असताना प्रशासनाकडून नगरसेवकांची अडवणूक करण्यासाठी ऑनलाइन सभेचा घाट घातला जात आहे, असा आरोप या नगरसेवकांनी केला. ऑनलाइनमुळे प्रभागातील समस्या मांडता येत नाहीत, चर्चा करता येत नाही, अशी तक्रारही त्यांनी केली. त्यामुळे आजची ऑनलाइन सभा नगरसेवकांच्या आंदोलनामुळे चांगलीच गाजली.