
सोलापूर-पुणे महामार्गावर असलेल्या केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सुमारे 150 हून अधिक प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाली आहे. मंगळवारी रात्री प्रशिक्षणार्थी पोलिसांना उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना सोलापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी बहुतांश प्रशिक्षणार्थी पोलिसांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आले आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये सुमारे 1320 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. त्यापैकी 150 हून अधिक विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ, जुलाब असा त्रास होऊ लागला. यामुळे प्रशिक्षण केंद्रामध्ये एकच धावपळ सुरू झाली. आकडा वाढतच चालल्याने सर्वांना सोलापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून याबाबतचा वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.