
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस आज सोलापुरात आले होते. उद्घाटनानंतर फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी वयोवृद्ध सामाजिक कार्यकर्ते विलास शहा आले. फडणवीस यांच्याशी बोलत असतानाच शहा जमिनीवर कोसळले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. विलास शहा यांना भोवळ आली होती. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील सोनांकूर कत्तलखाना बंद करावा, या मागणीसाठी विलास शहा गेली 15 वर्षे लढा देत आहेत. या मागणीचे निवेदन देण्यासाठी विलास शहा महसूल भवन उद्घाटनस्थळी आले. फडणवीस यांना ते आपली मागणी सांगत होते. फडणवीसांशी बोलता बोलता शहा थोडे खाली वाकले आणि कोसळले. यावेळी नेते आणि सरकारी अधिकाऱयांची एकच धावपळ उडाली. शहा यांना भोवळ आली होती. फडणवीस यांनी शहा यांना धीर दिला आणि पाणी पाजून खुर्चीवर बसवले. त्यानंतर फडणवीस यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, बबनराव शिंदे आणि भाजप पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
विलास शहा यांचा आत्मदहनाचा इशारा
सोलापूर-हैदराबाद महामार्गावर असलेला सोनांकुर कत्तलखाना बंद करावा. या कत्तलखान्यामुळे बोरामणी विमानतळाचा विकास होत नाही तसेच अनेक बांगलादेशी या कत्तलखान्यात काम करत आहेत. हे घुसखोर आहेत, असा आरोप विलास शहा यांनी केला आहे. येत्या 15 तारखेपर्यंत हा कत्तलखाना बंद नाही झाला तर आत्मदहन करणार, असा इशारा विलास शहा यांनी दिला.