मानवी तस्करी रोखण्यासाठी सोलापुरात ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेचा प्रारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंध विभागाच्या आदेशानुसार 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱया ‘ऑपरेशन मुस्कान’ या शोधमोहिमेचे उद्घाटन पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्या हस्ते करण्यात आले.

‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेअंतर्गत रेल्वे स्थानक, रुग्णालये, हॉटेल्स, धार्मिक स्थळे, दुकाने, बस स्थानके आदी ठिकाणी काम करणाऱया मुलांची माहिती घेण्यात येत आहे.

यासाठी शहरातील सात पोलीस ठाण्यांतील प्रत्येकी तीन महिला कर्मचारी, महिला कक्षाकडील पाच महिला कर्मचारी, अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर यांच्यासह 30 कर्मचाऱयांची पथके 30 डिसेंबरपर्यंत दररोज गस्त घालून बालमजूर, भिक्षा गोळा करणारे, कचरा गोळा करणारे, तसेच रेकॉर्डवरील 18 वर्षांखालील मुलांना ताब्यात घेणार आहेत.

या मुलांना जिल्हा महिला व बालविकास विभागासमोर समक्ष हजर करून बालक व पालक यांची खातरजमा केली जाईल. पोलिसांच्या मदतीला बालकल्याण मंडळ, ‘चाइल्ड लाइन’चे कर्मचारी सोबत राहणार आहेत.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक बजरंग साळुंके, ‘चाइल्ड लाइन’चे लक्ष्मण दुधाळे, स्वप्नील शेट्टी, आनंद ढेपे, मल्लिनाथ तमशेट्टी आदी उपस्थित होते.