सोलापुरात ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल, सहा जिल्हय़ांसाठी 93 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओडिशावरून आलेली ऑक्सिजन एक्सप्रेस आज सायंकाळी सोलापुरात दाखल झाली. या एक्प्रेसच्या सात टँकरमधून 93 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन आणण्यात आला असून, सोलापूरसह मराठवाडय़ातील पाच जिल्हय़ांना ऑक्सिजन पुरविण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना ऑक्सिजन कमी पडत आहे. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने रुग्णांचा मृत्यूही होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हय़ात ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी लिक्विड ऑक्सिजनची सोय करण्यात आली आहे. ओडिशा येथून आज एका विशेष रेल्वेद्वारे सात टँकर ऑक्सिजन टँकर बाळे स्टेशनवर उतरविण्यात आले. यात जवळपास 93 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन आहे.

सोलापूर जिल्हय़ासाठी 26 टन, लातूर -11, धाराशिव -12, संभाजीनगर -15, नांदेड -12, जालना जिल्हय़ासाठी 17 टन ऑक्सिजन वितरित करण्यात येणार आहे. ऑक्सिजन घेऊन जाण्यासाठी प्रत्येक जिल्हय़ाचे जिल्हा प्रशासन पथकही सोलापुरात आले आहे. सोलापूरला मिळालेल्या 26 टन लिक्विड ऑक्सिजनपैकी अर्मिकेन कंपनीत 16 टन, तर शासकीय रुग्णालयांत 10 टन साठा ठेवण्यात येणार आहे.