
सोलापूर शहरात सुरू असलेली स्मार्ट सिटीची कामे अतिशय संथगतीने सुरू असून, याबद्दल महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी पुन्हा एकदा खंत व्यक्त केली आहे. एबीडी एरियातील लोकांच्या तक्रारी वाढत आहेत, त्यामुळे स्मार्ट सिटीची सर्व कामे अधिक गतीने व्हावीत अशा सूचनाही त्यांनी स्मार्ट सिटी प्रशासनाला दिल्या आहेत.
स्मार्ट सिटी आणि महापालिका प्रशासन यांच्यात आयुक्त कार्यालयात समन्वय बैठक झाली. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक ढेंगळे-पाटील बैठकीला अनुपस्थित होते. बैठकीनंतर आयुक्त शिवशंकर म्हणाले, स्काडा, वॉटर ऑडिट आणि दुहेरी जलवाहिनीचे काम या तीन मुद्दय़ांवर बैठकीत चर्चा झाली. स्काडाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. कन्सल्टंट आणि ठेकेदार यांना याबाबतीत कामाचा वेग वाढवण्याची सूचना केली आहे.
उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम रखडले आहे. 85 किलोमीटरचे काम करण्यासाठी वर्क ऑर्डर दिलेली असताना फक्त 16 किलोमीटरचेच काम झाले आहे. पाणीपुरवठय़ाबाबत लोकांच्या तक्रारी वाढत आहेत. एबीडी एरियात दररोज पाणी देण्याचे नियोजन करायचे आहे. त्यासाठी दुहेरी जलवाहिनीचे काम लवकरच होणे गरजेचे आहे. याबाबतीतही संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांना सूचना दिली असल्याचे शिवशंकर यांनी सांगितले.
कामातील समन्वयाच्या बैठकीला स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक ढेंगळे-पाटील उपस्थित राहत नाहीत याबद्दलची खंत व्यक्त करताना आयुक्त म्हणाले, यापूर्वी घेतलेल्या एकाही आढावा बैठकीला ते येत नाहीत त्यामुळे कामाच्या प्रगतीची माहिती मिळत नाही. अशामुळे कामाची गती मंदावते. याबाबतीत स्मार्ट सिटीचे चेअरमन यांच्याकडे तक्रार केली असल्याचेही शिवशंकर यांनी सांगितले.


























































