सोलापूरला पावसाचा तडाखा, टेक्सटाईल कारखान्यांत पाणी; मशिनरी, मालाचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाच्या तडाख्यामुळे टेक्सटाईल्स कारखान्यांचे मोठे नुकसान झाले असून, कामगारांची रोजीरोटी बंद झाली आहे. ऐन दिवाळी सणात कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

सोलापुरात परतीच्या पावसाने तडाखा दिला असून, बुधवारी व गुरुवारी पडलेल्या पावसामुळे अनेक कारखान्यांत व कामगारवस्तीत पावसाचे पाणी व ड्रेनेजचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. सध्या रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची उंची वाढली असून, कामगारांच्या वस्त्या आणि कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. पाणी निचरा होण्याची सोय नसल्याने आणि पावसाच्या पाण्याबरोबर ड्रेनेजचे चेंबर तुडुंब भरून वाहात आहेत. रस्त्यावर जवळपास दोन ते तीन फूट पाणी साचलेले असून, अनेक कारखान्यांत पाणी शिरल्याने कारखाने आठ दिवसांपासून बंद आहेत. शेकडो कामगार या कारखान्यात रोजंदारीवर कामास जातात. विशेष करून अक्कलकोट रोडवर टॉवेल व चादर कारखाने असून, या कारखान्यांना पावसाचा जबर फटका बसला आहे. कारखान्यांत पाणी शिरल्याने मशिनरीबरोबरच कच्च्या मालाचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे कारखाने बंद ठेवण्यात आले असून, कामगारांना रोजगारही मिळेनासे झाले आहेत. यामुळे कामगार वर्ग मोठय़ा संकटात सापडला आहे.