सोलापूर झेडपी एलकेजी, युकेजी वर्ग सुरू करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा परिषद शाळेत प्रायोगिक तत्त्वावर एलकेजी, युकेजीचे वर्ग सुरू करण्याची कल्पना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी मांडली. जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय शिक्षण परिषद एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर माध्यमिक शिक्षणाधिकारी जावेद शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जाकीर, शिक्षण अधिकारी योजना सुलभा कटारे, डायट वेळापूरचे प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे, ड़ॉ इब्राहिम नदाफ, अधिव्याख्याता डॉ. क्रांती कुलकर्णी, डॉ. इरफान इनामदार, पर्यवेक्षिका राजश्री जंबेनाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यांसह जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख असे क्षेत्रीय स्तरावरील सुमारे 200 अधिकारी परिषदेस हजर होते.

जिल्हा परिषद शाळेत प्रायोगिक तत्त्वावर एलकेजी, युकेजीचे वर्ग सुरू करण्याची कल्पना मांडताना स्वामी यांनी उपस्थित अधिकाऱयांशी सखोल चर्चा केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजून घ्या, असे सांगत जिल्ह्यात प्रभावीपणे राबवले पाहिजे अशा सूचना केल्या. एलकेजी, युकेजी वर्ग सुरू करणे धोरणात नसले तरी आपण प्रायोगिक तत्त्कावर सुरू करू शकतो, त्याला कोणतीही हरकत नाही. जर आपण प्रभावीपणे हे वर्ग चालवले तर निश्चितच राज्यात ही संकल्पना राबवली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या परिषदेत विद्यार्थी आधार अपडेशन व संचमान्यता याविषयी माध्यमिक शिक्षणाधिकारी जावेद शेख यांनी मार्गदर्शन केले. शिक्षणाधिकारी (योजना) सुलभा कटारे यांनी विविध शासकीय विद्यार्थी लाभार्थी योजनांची माहिती दिली.

मुख्यालयातील विस्तार अधिकारी श्रीमती स्वाती स्वामी यांना स्वच्छता अभियानअंतर्गत लेट्स चेंज या उपक्रमात राज्यस्तराकरील उत्कृष्ट जिल्हा समन्वयक म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सोलापूर जिल्हा राज्यात बेस्ट ऑफ फाईव्ह ठरल्याबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जाकीर यांना सन्मानपत्र वितरित करण्यात आले.

प्राथमिक शिक्षणाधिकारी जाकीर यांनी परिषदेचे प्रास्ताकिक केले. विस्तार अधिकारी सुहास गुरव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विस्तार अधिकारी गोदावरी राठोड, रतिलाल भुसे, अतहर दफेदार, अधीक्षक प्रताप रूपनर, संगणक प्रोग्रामर इम्तियाज चंदरकी, अब्बास शेख आदी उपस्थित होते.