
सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने आज ऐतिहासिक भरारी घेतली. ‘पार्कर सोलर प्रोब’ हे नासाचे अंतराळयान पहाटे साडेतीन वाजता सूर्याच्या दिशेने झेपावले. एका कारच्या आकाराचे हे यान सूर्याच्या पृष्ठभागापासून ४० लाख मैल अंतरावरून जाणार आहे. केप कॅनवरल येथील प्रक्षेपण स्थळावरून डेल्टा ४ रॉकेटच्या सहाय्याने हे यान अंतराळात रवाना करण्यात आले. सूर्यमंडळातील अनेक अदृश्य गोष्टींना जगासमोर आणण्याची जबाबदारी या यानावर आहे.
सूर्याला गिळंकृत करायला हनुमानाने बालपणीच झेप घेतली होती असा उल्लेख पुराणात आढळतो. १९७६मध्ये ‘हेलियोस २’ हे यानही सूर्याच्या जवळून गेले होते. तेव्हा हेलियोस सूर्यापासून ४ कोटी ३० किलोमीटरवर जाऊन थांबले होते. पृथ्वीपासून सूर्यापर्यंतचे अंतर ९ कोटी ३० लाख मैल एवढे आहे. ‘पार्कर’ ८५ दिवसांनंतर म्हणजे ५ नोव्हेंबर रोजी सूर्यमंडळात प्रवेश करणार आहे.
अमेरिकेचे खगोलशास्त्रज्ञ युजीन नेवमॅन पार्कर यांच्या नावावरून या मोहिमेचे नाव ठेवण्यात आले आहे. पार्करचा वेग १९० किमी प्रति सेकंद असून पृथ्वीवर याच वेगाने वाहन चालवले तर मुंबई ते दिल्ली हे अंतर अवघ्या ७ सेकंदात पार करता येईल. १३७१ डिग्री सेल्सियस एवढय़ा उष्ण तापमानाचा सामना करण्याची शक्ती पार्करमध्ये आहे. हे यान शनिवारीच झेपावणार होते, पण ऐनवेळी हेलियम अलार्म वाजला आणि उड्डाण थांबवण्यात आले.
या प्रकल्पावर नासाने १०३ अब्ज रुपये खर्च केले असून हे यान ९ फूट १० इंच लांबीचे आहे आणि वजन आहे ६१२ किलो. पुढील ७ वर्षे हा उपग्रह सूर्याचे वातावरण समजून घेणार आहे. सूर्याच्या चहूबाजूने कशा प्रकारे ऊर्जा आणि प्रकाश निर्माण होतो याचा अभ्यास करणार आहे. या सोबत ११ लाख लोकांची नावेही सूर्यमंडळात गेली आहेत. या मोहिमेतील सहभागासाठी ‘नासा’ने मार्चमध्ये जनतेकडून नावे मागवली होती. मेपर्यंत तब्बल ११ लाख ३७ हजार २०२ जणांनी नावनोंदणी केली. ही सर्व नावे मेमरी कार्डमधून यानासोबत पाठविण्यात आली आहेत. या यानाचा ताशी वेग ४ लाख ३० हजार कि.मी. इतका असून सात वर्षात ते सूर्याला ७ प्रदक्षिणा घालणार आहे. या यानामध्ये २५०० डिग्रीची उष्णता झेलण्याची क्षमता असून त्याला हिट शिल्डने सुरक्षित करण्यात आले असून ते ११.४३ सेंटीमीटर जाड आहे.




























































