
महापालिकेतील कचरा घोटाळ्यासंदर्भातील काही कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागले आहेत, काही कर्मचाऱयांचे जबाबसुद्धा घेण्यात आले आहेत, तर दुसरीकडे आरटीओकडून काही माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या कचरा घोटाळ्यासंदर्भातील तपास पुन्हा सुरू झाला आहे.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी सुमारे 1 कोटीहून अधिक रुपयांचा कचरा घोटाळा उजेडात आणला होता. या संदर्भात न्यायालयाच्या आदेशानंतर तोफखाना पोलिसांत ठेकेदारवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तोफखाना पोलिसांनी महापालिकेकडे कागदपत्रांची मागणी केली आहे. पहिल्या टप्प्यात मिळालेली कागदपत्रे अर्धवट होती. त्यामुळे दुसऱयांदा पत्र देवून उर्वरित माहिती सत्यप्रतीमध्ये देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली आहे. महापालिकेने काही दिवसांची मुदत यासाठी मागितली आहे. या घोटाळ्य़ात देण्यात आलेल्या वाहन क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी आरटीओला पत्र देऊन या वाहनांची सविस्तर माहिती देण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी महापालिकेच्या काही कर्मचाऱयांचे जबाबसुद्धा नोंदविलेले आहेत. पोलीस प्रशासनाने याचा गतिमान तपास सुरू केला आहे, तर दुसरीकडे न्यायालयाच्या अवमानप्रकरणी न्यायालयामध्ये बुधवारी सुनावणी होणार असून, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.























































