दूषित पाण्याच्या तक्रारी 24 तासांत सोडवा, रात्रपाळीत काम करा, आणखी कामगार घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये तसेच अनेक सोसायट्यांमध्ये पिण्याच्या पाइपलाइन गटारातून गेल्या आहेत. त्यामुळे दर पावसाळ्यात पाणी साचून अनेक भागात दूषित पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे गॅस्ट्रो, कावीळ यांसारख्या आजारांचा मुंबईकरांना सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना 100 टक्के शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी दूषित पाण्याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर दुर्बिण टाका, रात्रपाळीत काम करा, आणखी कामगार घ्या, पण दूषित पाण्याचा प्रश्न 24 तासांत निकाली काढा, असे आदेश राज्य सरकारच्या वतीने महापालिका अधिकारी, अभियंत्यांना देण्यात आले.

मुंबईत मोठ्या प्रमाणावर छोट्या-मोठ्या जलवाहिन्यांचे जाळे पसरले आहेत. अनेक भागांत पाण्याच्या पाइपलाइन गटारातून, चिखलातून जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दूषित पाण्याचा पुरवठा होतो. या पार्श्वभूमीवर सरकार याप्रकरणी काय उपाययोजना करणार आहे, असा प्रश्न विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला विचारला. त्याला नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी उत्तर दिले. गोरेगाव येथील उन्नतनगर, प्रेमनगर, समतानगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दूषित पाण्याच्या तक्रारी आल्याचे पाटील यांनी सांगितले. अशा प्रकारे अर्ध्या मुंबईला गढूळ पाणी प्यावे लागत असून याबाबत सरकार काय खबरदारी घेणार, असा सवालही त्यांनी केला. यावर पूर्व, पश्चिम उपनगरे तसेच मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर दूषित पाण्याच्या तक्रारी मार्गी लावण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • सरकार या उपाययोजना करणार
  • मुंबईत विविध ठिकाणी 68 ठिकाणच्या जागा निश्चित केल्या असून या ठिकाणांहून दर महिन्याला पाण्याचे तीन हजार नमुने घेतले जात आहेत.
  • दूषित पाण्याची तक्रार आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा करण्याआधी येथे स्वच्छ पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
  • मुंबईत अनेक भागांत टनेल यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या पाईपलाइनचा प्रश्नच उद्भवणार नाही.
  • या कारणांमुळे गढूळ पाण्याचा पुरवठा
  • मुंबईत अनेक भागांत कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत असल्याचे आढळल्यास त्यांना पाईपलाईन बदलण्यास सांगितले जाते.
  • पाईपलाईन बदलताना गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता असते.