
महेंद्र पाटील << [email protected] >>
नेहमीच माझं मन खूप काही बोलतं. नेहमीच तुझं मन खूप काही बोलतं. तुझ्या मनाचा प्रत्येक शब्द मी आजवर माझ्या मनात जपत आलोय आणि तू रोज माझे नवीन शब्द ऐकायला आतुर… तू माझ्या शब्दांची मनापासून वाट पाहतेस म्हणून मला ते सुचतात. जेव्हा त्यांना तू माझ्या मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवतेस तेव्हा त्यांना मोक्ष मिळतो. अशा कित्येक संध्याकाळी मी फक्त तुला डोळय़ासमोर ठेवून लिहित गेलो. ऊन, वारा, पाऊस, धुकं सगळं भोवताली असायचं, तरी मी अविरतपणे शब्दांशी खेळत बसायचो. असं करता करता हळूहळू मी मनाचा थांग घ्यायला शिकलो आणि मनाच्या गोष्टी उलगडू लागल्या. मन एखाद्या पुस्तकासारखं वाचू लागलो. प्रत्येक पानावर नवीन काहीतरी अनुभवत होतो मी. पानं उलगडू लागली आणि मनातले सारे प्रहर, साऱ्या भावना, सारे प्रश्न डोळय़ांसमोर दिसू लागले. प्रत्येक प्रहर निराळा, प्रत्येक अदा निराळी, प्रत्येक भावना वेगळी. किती खोल आणि गहन असतं ना मन! थांग न लागणाऱ्या सागरासारखं, अथांग आकाशासारखं.
आज पुन्हा एकदा तशीच संध्याकाळ… मी पुन्हा काहीतरी मनावर लिहित बसलोय. लिहिता लिहिता माझं मन जरा मागे चालत जातं आणि त्याला एक मोठा रस्ता दिसतो. माझ्या शब्दांचा… त्या रस्त्यावर आठवणीच्या सावल्या माझी वाट पाहात होत्या. मी त्या वाटेवरून चालू लागलो तेव्हा ऐकू आले मनाला तिच्या मुक्या हुंदक्यांचे बोल आणि दिसली काही मनं. घुसमटणारी, धुमसणारी आणि त्यातून जन्माला आलेली शापित नाती. त्या शापित नात्यांचा गुंता सोडवत मन पुढे चालू लागतं. एकेक आठवणी मला भेटायला येतात आणि पुन्हा मनातले जुने बंध उसवले जातात. काही आठवणी हसतात तर काही आठवणी रुसून बसतात. मनातल्या ऋतू सरलेल्या आठवणी, विरहाचे क्षण आणि बदलणारे मनाचे रंग, अशा प्रत्येक गोष्टी पुन्हा भेटून मन भरून येतं. चालता चालता संध्याकाळ होते तरी लक्षात येत नाही. मन पुन्हा हुरहुरतं, जरासं काहुरतं. का कुणास ठाऊक, पण त्याची नेहमीची सवय आहे ही. तोवर अलगदपणे कातरवेळ निसटून जाते आणि मनात कुठेतरी प्रश्न निर्माण होतात. मन म्हणजे नेमकं काय आणि मनाला पडणारे प्रश्न येतात तरी कुठून?
पावलोपावली, क्षणोक्षणी मनात काही ना काही विचार सुरू असतातच. या सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेणारं मन सगळं काही अनुभवून अतृप्त का असतं? मन हळवं का होतं आणि तेच हळवं मन कधी कधी पाषणासारखं स्तब्धसुद्धा होतं. एकाच मनाच्या या दोन बाजू कशा? नेमका मनाचा खरा चेहरा कोणता? आपला चेहरा म्हणजे मनाचा आरसा असतो असं म्हणतात. तर मग मन काय असतं हे आजवर ठोसपणे कुणीच का सांगू शकलं नाही? किंबहुना मनाच्या तळापर्यंत पोहोचून मनाची उत्पत्ती ओळखणं तितकंच कठीण. तरीही मी का वेडय़ासारखं मनाच्या पाठी धावत त्याचा थांग घेण्याचा प्रयत्न करतो? का मनातला प्रत्येक प्रश्न हा मीच सोडवू शकतो असं माझ्या मनाला वाटतं? या प्रश्नांची उत्तरं काही मला मिळत नाहीत. मग मी परतीच्या वाटेवर असताना वाटेवरच्या आठवणी प्रत्येक वळणावर मला भेटतात. त्यांच्या कंठात गहिवर दाटून आलेला असतो आणि डोळय़ात उतरलेला असतो ओला पाऊस. पुन्हा एका वळणावर मनातले असंख्य गुदमरलेले क्षण मला भेटतात. त्यांच्याशी दोन शब्द बोलून मी त्यांची समजूत काढतो आणि चालू लागतो पुन्हा. एकीकडे मनात विचार सुरू असतात की यापुढे कधी कुणाच्या मनाचा थांग घ्यायचा नाही. परंतु जर मी असं केलं तर काय होईल या वाटेवरच्या भावनांचं, या वाटेवरल्या आठवणींचं? कारण मनाच्या डोहात खोलवर असलेल्या या आठवणींना मीच माझ्या ओंजळीत घेऊन एका नव्या प्रवासाला घेऊन जातो. त्या आठवणी पुन्हा नव्याने जगू लागतात. आजवर जपलेले मनाचे प्रत्येक प्रहर माझ्या या निर्णयामुळे एका क्षणात पोरके होतील. ही जाणीव मला झाली तसंच अशाच काही असंख्य आठवणी, अगणित क्षण, घुसमटलेले प्रहर, पावसातल्या ओल्या व्याकूळ रात्री आणि कोमेजलेली मनं कुठेतरी माझी वाट पाहत असतील या विचाराने मी पुन्हा मला सावरून एका नव्या वाटेवर चालू लागतो. काही अनुत्तरीत प्रश्न पुन्हा समोर येऊन उभे ठाकतात. पुन्हा मी मनाचा गुंता सोडवत पुढे चालू लागतो. नव्या उत्तरांच्या शोधात.
मी शोधीत जात होतो तो बहर सावल्यांचा
वाटेत प्रत्येक माझ्या स्पर्श तुझ्या पावलांचा





























































