चोलांचा कळसाध्याय – बृहदीश्वर मंदिर

>> सोनल शहा

दक्षिण हिंदुस्थानी इतिहासातील एक सशक्त अशी राजवट चोल राजवट यांचा प्रथम लिखित उल्लेख येतो मौर्य राजा अशोकाच्या शिलालेखात ( इ. पू. 3 रे श.). अशोक साम्राज्याच्या सीमांवरचे चोडा, पाडा असे दक्षिणेतील संगम साहित्य, पेरिप्लस ऑफ एरिथ्रिअन सीमधूनही याचे संदर्भ मिळतात, तर भूगोल अभ्यासक टॉलेमीने चोलांच्या व्यापारासंबंधित दखल घेतली आहे. अशा चोल वंशातील एक राजा अरुमोलीवर्मन होय (इ.स.985-1014). चोलांच्या राजसिंहासनावर हा अरुमोलीवर्मन बसल्यावर राजराजा (राजांचा राजा) नावाने जनमानसात ओळखला जातो. याच्या कारकीर्दीत एका भव्य शिवमंदिर निर्मितीचे आदेश दिले गेले, निर्मिती केली गेली. म्हणून या मंदिराचे राजराजेश्वर हे नावसुद्धा प्रचलित आहे. आजच्या तामीळनाडूमध्ये चेन्नईच्या नैऋत्येस 350किमीवर असलेल्या तंजावर जिह्याच्या गावी दिमाखात उभे आहे.

राजराजेश्वर मंदिर चोलांच्या वैभवाचे द्योतक आहे. दक्षिण हिंदुस्थानी मंदिर स्थापत्य बांधणीतील एक नोंद घेण्याजोगी ऐतिहासिक घटना आहे. मंदिराची बांधणी ग्रॅनाईटमध्ये केली आहे, जो जवळपासच्या परिसरात कुठेही आढळत नाही, परंतु हजार वर्षांपूर्वी तो मंदिर बांधणीसाठी उपलब्ध केला व भव्य मंदिर साकार झाले.

शैव तत्त्वज्ञानातील एक महत्त्वाची संकल्पना नटराज शिव. अज्ञानाचे प्रतीक असलेल्या अपस्मारावर अविरत नृत्य करता करता सृष्टीची नवनिर्मिती व विलय करणारा नटराज शिव अप्रतिम आहे. गणेश, खुद्द शिवाचा अंश असलेला वीरभद्र, दुष्टांचे निर्दालन करणारी महिषासुरमर्दिनी, भिक्षाटनशिव, चंद्रशेखरशिव, शिव- विष्णू या दोन तत्त्वप्रणालींना एकत्र आणणारा हरिहर, अर्जुनपाशुपतास्त्र्ाप्राप्ती, कल्याणसुंदर, मार्कंडेयानुग्रह अशा शिवसंबंधित शिल्पांची रेलचेल मंदिराच्या बाह्यांगावर दिसते.

पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी दोन्ही बाजूस larger than life द्वारपाल आहेत. उजेडासाठी जालवातायनाची योजना केली आहे. मुखमंडप, नंतर भव्य शिवलिंगाची स्थापना केलेले गर्भगृह आहे. गर्भगृहाभोवती सांधार प्रदक्षिणा मार्ग आहे. नंदी मंडपातील एकपाषाणी नंदी लक्षवेधक आहे. मंदिर आवारातील तीनही बाजूस ओवऱया असून त्यातील भित्तिचित्रे आज संरक्षित केली आहेत. गर्भगृहावर खास द्राविड शैलीचे, आकाशाकडे झेपावणारे विमान म्हणजे शिखर आहे. कूट, शाला, पंजर या दक्षिण स्थापत्यातील पारंपरिक घटकांचा साज चढविलेला आहे. त्यांच्या लघु प्रतिकृतींचा कलात्मक वापर शिखरासाठी केला आहे. सगळ्यात वर अष्टकोनी, एकपाषाणी स्तुपी आहे, ज्याचे वजन सुमारे 80 टन आहे. ही स्तुपी सुमारे हजार वर्षांपूर्वी शिखरावर कशी बसवली गेली हा संशोधकांसाठी महत्त्वाचा विषय आहे.

चोल युगातील कलेचा सर्वोत्तम आविष्कार म्हणजे शिवाच्या 108 नृत्यमुद्रा होय. याचे शिल्पांकन मंदिराच्या पहिल्या मजल्यावर केले आहे. राजराजा चोल गुरूला वंदन करतानाचे येथील भित्तिचित्र त्याची साक्ष देते. मंदिराच्या बाह्यांगावर कोरलेले शिलालेख म्हणजे चोलांच्या विजयगाथा आहेत. मंदिर प्रतिष्ठापनेवेळी राजाने दान केलेल्या कथा इथे शब्दबद्ध केल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याची एक शाखा तंजावरमध्ये होती. मंदिराच्या प्रांगणात भोसले घराण्याची वंशावळ कोरलेली आहे. या राजांनी मंदिराची डागडुजी केली आहे. यामुळे मंदिराच्या प्रत्यक्ष जडणघडणीत नाही, तर नूतनीकरणासाठी मराठी माणसाचा हातभार लागला आहे ही अभिमानास्पद बाब आहे. चोल शासनकाळातील बृहदीश्वर मंदिराबरोबर गंगैकोंडचोळपुरम, दारसुरम ही मंदिरे The Great Chola Temples म्हणून ओळखली जातात. 1987 मध्ये युनेस्कोने या मंदिराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. यामुळे हे मंदिर जागतिक पर्यटनस्थळांच्या नकाशावर आले. भक्ती परंपरा, चोलकालीन शिल्पकला, भित्तिचित्रकला, नृत्यकला, आर्थिक सुबत्ता, चोलांचा सागरी व्यापार याचे अधिष्ठान म्हणजे बृहदीश्वर मंदिर होय.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या