रत्नागिरीची सौम्या मुकादम हिची राष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी निवड

मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य योगासन अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या रत्नागिरीच्या सौम्या देवदत्त मुकादम हिची राष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा डिसेंबर महिन्यात मुंबईत होणार आहेत.

नॅशनल योगासन स्पोर्टस् फाऊंडेशनतर्फे 27 व 28 नोव्हेंबरला मुंबई येथे महाराष्ट्र राज्य योगासन अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आल्या. पाच गटांत झालेल्या या स्पर्धेत रत्नागिरीच्या जीजीपीएस गुरुकुलमध्ये सातवीत शिकणाऱ्या सौम्या मुकादम हिने भाग घेतला होता. तिने सब ज्युनियर गर्ल्स या गटात पारंपरिक योगा या प्रकारात सादरीकरण केले. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. सौम्याला जीजीपीएसच्या योगा शिक्षिका श्रद्धा जोशी यांचे मार्गदर्शन मिळाले.

राज्य स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते झाला. यावेळी नॅशनल योगासन स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष सुधीर गोकर्ण, जनरल सेक्रेटरी हेमा शहा, ट्रेझरर सोनाली गोकर्ण, चॅम्पियनशिप डायरेक्टर पल्लवी कव्हाणे उपस्थित होते. राष्ट्रीय स्पर्धा डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मुंबईमध्येच होणार आहेत.