
प्रौढ पुरुष व स्त्रीने परस्पर संमतीने ठेवलेले संबंध लग्नापर्यंत पोहोचले नाहीत, त्या संबंधांमध्ये अचानक कटुता आली म्हणून जोडीदारावर बलात्काराचा आरोप करणे चुकीचे आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवले. कोणत्याही कारणावरून लग्न होऊ शकले नाही म्हणून दोघांपैकी एकाला दोषी धरता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
26 वर्षीय तरुणीचे सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले होते. त्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवले. मात्र काही कारणामुळे तरुणाने लग्नाला नकार दिल्यानंतर तरुणीने त्याच्याविरुद्ध वर्सोवा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात आरोपी तरुणाला दोषमुक्त करण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला होता. त्या निकालाला तरुणाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याच्या याचिकेवर सुनावणी करीत न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी आरोपी तरुणाची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.
आरोपी तरुण आणि तरुणीची ऑनलाइन भेट झाल्यानंतर त्यांचे मैत्रीचे संबंध दृढ झाले होते. तरुणीने शरीरसंबंधाला दिलेल्या संमतीमागे केवळ आरोपीने दिलेले लग्नाचे वचन हे एकमेव कारण नव्हते, तर तरुणीही तरुणाच्या प्रेमात पडली होती. तरुणीने तसा जबाबही दिला होता, असे नमूद करीत न्यायमूर्ती डांगरे यांनी याचिकाकर्त्या तरुणाला दिलासा दिला. संबंधामध्ये आता कटुता आल्यामुळे प्रत्येक प्रसंगी तरुणीशी प्रस्थापित केलेले शारीरिक संबंध तिच्या इच्छेविरुद्ध आणि तिच्या संमतीशिवाय होते असा अंदाज लावता येणार नाही, असेही न्यायालयाने आदेशामध्ये म्हटले आहे.
























































