ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपप्रकरणी दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा ईडीसमोर हजर

ऑनलाइन बेटिंग अॅपच्या प्रमोशनमुळे दक्षिणेतील अभिनेता विजय देवरकोंडा याला ईडीने समन्स बजावले होते. विजय सकाळी 11 वाजण्यास सुमारास बशीरबाग येथील केंद्रीय एजन्सीच्या प्रादेशिक कार्यालयात पोहोचला. या प्रकरणात दक्षिण भारतातील बड्या अभिनेत्यांचे आणि अनेक मोठ्या सोशल मीडिया निर्मात्यांची नावे समाविष्ट आहेत. बेटिंग अ‍ॅप्सच्या प्रमोशनसाठी केलेल्या डील आणि त्यांच्याकडून मिळालेल्या पेमेंटबद्दल त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

विजय देवरकोंडा हा या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर होणारा दुसरा अभिनेता आहे. केंद्रीय एजन्सीने 30 जुलैला प्रकाश राज यांची 5 तास चौकशी केली होती. प्रकाश राज यांनी अधिकाऱ्यांना सांगितले होते की, त्यांनी वर्षांपूर्वी केलेल्या जाहिरातीच्या प्रमोशनसाठी कोणतेही शुल्क घेतले नाही.

अधिकाऱ्यांनी 2016 मध्ये बेटिंग अ‍ॅपसाठी त्यांनी केलेल्या जाहिरातीबद्दल माहिती मागितली होती. प्रकाश राज म्हणाले की, त्यांनी ईडी अधिकाऱ्यांना सांगितले होते की त्यांनी कोणतेही पैसे घेतले नाहीत, कारण त्यांचा विवेक त्यांना तसे करण्याची परवानगी देत नव्हता.

ईडीने दक्षिणेतील अभिनेते विजय देवरकोंडा, राणा दुगाबाती, प्रकाश राज यांच्यासह 29 चित्रपट कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. हे सेलिब्रिटी आधीच बेटिंग अॅप्सच्या प्रमोशनसाठी जुगाराशी संबंधित प्रकरणात आरोपी आहेत. काही काळापूर्वी ईडीने मनी लाँड्रिंगचाही गुन्हा दाखल केला होता. हैदराबाद सायबराबाद पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीची कारवाई करण्यात आली. या सेलिब्रिटींवर या बेकायदेशीर बेटिंग अॅपचा प्रचार केल्याचा किंवा त्याद्वारे व्यवहारांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मनी लाँड्रिंग आणि बेकायदेशीर बेटिंगशी संबंधित पैलूंची चौकशी केली जात आहे. ईडी आता या सर्व सेलिब्रिटींची चौकशी करत आहे.