दक्षिण आफ्रिकेचा मालिका विजय, हिंदुस्थानी महिलांवर 7 विकेट राखून विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात हिंदुस्थानचा 7 गडी व 8 चेंडू राखून पराभव केला. या विजयासह पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी आधीच खिशात टाकली. पूनम राऊतची शतकी खेळी व्यर्थ ठरली. मिगनॉन डू प्रीझ ही या सामन्याची मानकरी ठरली.

हिंदुस्थानकडून मिळालेले 267 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने 48.4 षटकांत 3 बाद 269 धावा करीत पूर्ण केले. यात लिझेल ली (69), लौरा वॉल्वर्ड्ट (53), लारा गुडल (नाबाद 59) मिगनॉन डू प्रीझ (61) व मॅरिझने कॅप (नाबाद 22) यांनी उपयुक्त फलंदाजी केली. हिंदुस्थानकडून मानसी जोशी, राजेश्वरी गायकवाड व हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.

त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 4 बाद 266 अशी धावसंख्या उभारली. स्मृती मंधना (10) व प्रिया पुनिया (32) ही सलामीची जोडी बाद झाल्यानंतर पूनम राऊतने नाबाद 104 धावांची खेळी केली. कर्णधार मिताली राज (45) व हरमनप्रीत कौर (54) यांनीही उपयुक्त फलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेकडून तुमी शेखूखूने हिने 2, तर शाबनीम इस्माईल व नॉन्दुमीसो शांगास यांनी 1-1 खेळाडू बाद केली.

दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने सहा वर्षांनंतर हिंदुस्थानविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. याआधी नोव्हेंबर 2014 मध्ये हिंदुस्थान दौऱयावरच दक्षिण आफ्रिकेने मालिका विजय साजरा केला होता.