
टी-20 या वेगवान फॉरमॅटमध्ये एक चांगले षटकही सामना फिरवू शकतो. हा थरार अनेकदा अनुभवायाला मिळाला असतानाही आज चक्क दहाव्या षटकात सूर्यकुमार यादवची विकेट पडताच हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींनी संघाचा पराभव मान्य करत स्टेडियम रिकामे करायला सुरुवात केल्याचे निराशाजनक दृश्य पाहायला मिळाले. हिंदुस्थानी संघानेही क्रिकेटप्रेमींनी दाखवलेला विश्वास 111 धावांवर शरणागती पत्करत सार्थ ठरवला.
दक्षिण आफ्रिकेने दिलेले 188 धावांचे आव्हान मोठे असल्याचा साक्षात्कार तिन्ही सलामीवीर 26 धावांवर बाद झाल्यावर आला होता. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदरचा दबावाखाली सुरू असलेल्या खेळाने संघाचेच नव्हे तर प्रेक्षकांचेही मनोधैर्य खचले. या दोघांनी मैदान सोडल्यानंतर प्रेक्षकांनीही मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. कारण 10 षटकांत 131 धावांचा एव्हरेस्ट गाठणे कठीण होते. त्यामुळे हरलेला सामना न पाहणेच बरे असून म्हणून प्रेक्षकांनी परतीचा मार्ग धरला. पुढे शिवम दुबेने केवळ पराभवाचे अंतर कमी करत संघाला शंभरी गाठून दिली, हीच काय ती समाधानाची बाब.
संकटमोचक मिलर
संकटमोचक मिलर पुन्हा एकदा संघरक्षणासाठी धावून आला आणि त्याने डेव्हाल्ड ब्रेविसला हाताशी घेत नुसत्या धावा काढल्या नाही तर मैदानाच्या चोहोबाजूंना फटकेबाजी केली. दोघांनी अवघ्या 8.2 षटकांत 97 धावांची भागी केली. मिलरने 35 चेंडूंत 63 धावा चोपल्या तर ब्रेव्हिसने 45 धावा. दोघे बाद झाल्यानंतर आफ्रिकेची पडझड झाली, पण ट्रिस्टन स्टब्सने 24 चेंडूंत 3 षटकार खेचत नाबाद 44 धावा केल्या आणि संघाला 187 धावांपर्यंत नेले.
बॉशचा हिंदुस्थानला हादरा
3 बाद 26 नंतर हिंदुस्थानला सूर्यकुमारकडून चमत्काराची आशा होती, पण आज त्याच्या फटक्यांवर आफ्रिकेने लगाम घातला होता. त्याला खुलून खेळता यावे म्हणून मारक्रमने कॉर्बिन बॉशच्या हाती चेंडू दिला आणि त्याने आधी अक्षर पटेलच्या जागी आलेल्या वॉशिंग्टन सुंदरचा काटा काढला आणि मग सूर्यकुमार यादवलाही झेल देण्यास भाग पाडून हिंदुस्थानची 5 बाद 51 अशी केविलवाणी अवस्था केली. येथेच हिंदुस्थानच्या टी-20 वर्ल्ड कपमधील सलग 13 विजयांची मालिका खंडित झाली होती. पुढे फक्त पराभवाची औपचारिकता पूर्ण करण्यात आली.
शिवम दुबेने शतकापार नेले
पन्नाशीत अर्धा संघ बाद झाल्यावर स्टेडियमही रिकामे होऊ लागले होते. कारण कितीही फटकेबाजी केली तरी संघ जिंकणार नाही, याची क्रिकेटप्रेमींना खात्री होती. त्यातच केशव महाराजने आपल्या एकाच षटकात हार्दिक पंडय़ा, रिंकू सिंह आणि अर्शदीप सिंगची विकेट काढत आफ्रिकेचा विजय निश्चित केला. मग मधल्या फळीत तुफानी फटकेबाजी करणाऱया शिवम दुबेने षटकार खेचत संघाला शतकापार नेले.
बुमरा-अर्शदीपची भेदक सुरुवात
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून मोदी स्टेडियमवर स्वतःच फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे हिंदुस्थानच्या स्पीडस्टार जोडी जसप्रीत बुमरा आणि अर्शदीप सिंगने दाखवून दिले. बुमराने आपल्या पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर क्विंटन डिकॉकची अलगद बेल्स उडवली. मग अर्शदीपने एडन मारक्रमला पॅव्हेलियनचा मार्ग दाखवत दुसरा हादरा दिला. त्यानंतर बुमराच्या आणखी एका अप्रतिम चेंडू रायन रिकल्टनचा काटा काढत 4 षटकांत 3 बाद 20 अशी बिकट अवस्था केली. या अवस्थेनंतर आफ्रिकन डाव गुंडाळण्यात हिंदुस्थानी फिरकीबहाद्दर यशस्वी ठरतील अशी माफक अपेक्षा होती. पण तसे घडले नाही.



























































