दक्षिण आफ्रिकेचे शेपूट वळवळले, हिंदुस्थानकडे तरीही 326 धावांची आघाडी

382

>> विठ्ठल देवकाते

दक्षिण आफ्रिकेच्या शेपटाने केलेल्या प्रतिकारानंतरही यजमान हिंदुस्थानने दुसऱया कसोटी क्रिकेट सामन्यातील पहिल्या डावात 326 धावांची मोठी आघाडी घेण्यात यश मिळविले. पहिल्या कसोटीत रुबाबदार विजय मिळविलेल्या विराट सेनेने दुसऱया कसोटी क्रिकेट सामन्यातही विजयाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे. हिंदुस्थानच्या पहिल्या डावातील 601 धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 105.4 षटकांत 275 धावसंख्येवर संपुष्टात आल्यानंतर तिसऱया दिवसाचा खेळ संपविण्यात आला. केशव महाराज (72) व वेर्नोन फिलॅण्डर (44) यांची शतकी भागीदारी आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने टिपलेले 4 बळी ही कसोटीतील तिसऱया दिवसाची वैशिष्टय़े ठरली. दक्षिण आफ्रिकेच्या तळाच्या फलंदाजांनी अर्थातच शेपटाने कडवी झुंज दिल्यामुळे त्यांना पावणेतीनशे धावा करता आल्या.

डू प्लेसिस-डी. कॉकचा प्रतिकार
दक्षिण आफ्रिकेचा डाव 21 षटकांत 5 बाद 53 असा संकटात असताना कर्णधार फाफ डू प्लेसिस (64) व क्विंटन डी कॉक (31) यांनी हिंदुस्थानी गोलंदाजांचा काही वेळ प्रतिकार केला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी केली. रविचंद्रन अश्विनने एका अप्रतिम चेंडूवर डी. कॉकच्या बेल्स उडवून ही जोडी फोडली. त्याच्या जागेवर आलेल्या सेनुरॅन मुथूसॅमीला रवींद्र जाडेजाने झपकन आत वळवलेल्या चेंडूवर पायचीत पकडून हिंदुस्थानला सातवे यश मिळवून दिले.

अर्ध्या तासात दोन बळी
दक्षिण आफ्रिकेने दुसऱया दिवसाच्या 3 बाद 36 अशा केविलवाण्या स्थितीतून शनिवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र, मोहमद शमी व उमेश यादव या वेगवान जोडगोळीने अर्ध्या तासात दोन फलंदाजांना तंबूत धाडून पहिल्या सत्रातच दक्षिण आफ्रिकेला तडाखा दिला. शमीने तिसऱयाच षटकात ऍनरिक नॉर्थजे (3) याला बाद केले. शुक्रवारच्या धावांत केवळ एका धावेची भर घालणाऱया नॉर्थजेचा विराट कोहलीने चौथ्या स्लिपमध्ये अफलातून झेल टिपला. त्यानंतर उमेश यादवने थ्युनिस डी ब्रुयनला (30) चकवले अन चेंडू यष्टीमागे सहाच्या ग्लोव्हज्मध्ये विसावला.

तळाच्या फलंदाजांची झुंज
मधल्या फळीतील डू प्लेसिसने 117 चेंडूंत 9 चौकार व एका षटकारासह 64 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अश्विनने त्याला स्लिपमध्ये रहाणेकरवी झेलबाद करून बहुमोल बळी टिपला. दक्षिण आफ्रिकेचा डाव आता दोनशेच्या आत संपणार असे वाटले होते. मात्र, वेर्नोन फिलॅण्डर (नाबाद 44) व केशव महाराज (72) या तळाच्या फलंदाजांनी 109 धावांची भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेला अडीचशेचा टप्पा ओलांडून दिला. शेवटी 132 चेंडूंत 12 चौकारांसह 72 धावा करणाऱया केशव महाराजला अश्विनने रोहित शर्माकरवी झेलबाद करून ही डोकेदुखी ठरलेली जोडी फोडली. अश्विनने कॅगिसो रबाडाला (2) पायचीत पकडून दक्षिण आफ्रिकेचा डाव संपवला. एका बाजूने खेळपट्टीला घोरपडीप्रमाणे चिटकून राहिलेल्या फिलॅण्डरने नाबाद 44 धावांच्या खेळीत 192 चेंडूंना सामोरे जाताना 6 चौकार लगावले.

क्रिकेटच्या मैदानावर घुमला कबड्डीचा दम
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अभिनव उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पुण्यातील दुसऱया कसोटी सामन्याची मोफत तिकिटे देण्यात आली आहेत. मात्र, प्रो कबड्डीमुळे सध्या मुलांना या मर्दानी खेळाने चांगलीच भुरळ घातली आहे. याचा प्रत्यय चक्क हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱया कसोटी क्रिकेट सामन्यादरम्यान बघायला मिळाला. वेर्नोन फिलॅण्डर व केशव महाराज ही दक्षिण आफ्रिकेची जोडी बाद होत नसल्याने बोअर झालेल्या सिग्नेट पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चक्क क्रिकेट बघायचे सोडून कबड्डी खेळायला सुरुवात केली. क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटपटूंच्या जयघोषाऐवजी काही वेळ चक्क कबड्डीचा ‘दम’ घुमल्याने प्रेक्षकांसाठी ही बच्चे कंपनी कुतूहलाचा विषय बनली होती.

आपली प्रतिक्रिया द्या