
नुकत्याच नेपाळच्या ललितपूर येथे झालेल्या दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय मास्टर नुबैरशाह शेखने अपराजित राहात सलग दुसऱयांदा सुवर्णपदकाला गवसणी घातली. ही दुसरीच दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धा होती.
नोव्हेंबर 2019 मध्ये ढाक्यात झालेल्या पहिल्या दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धेतही नुबैरशाह शेखनेच सुवर्णपदक जिंकले होते. दक्षिण आशियाई आठ देशांपैकी हिंदुस्थान, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, मालदीव या देशांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. पुरुष व महिला दोन्ही गटांची ही स्पर्धा स्वतंत्रपणे घेण्यात आली. प्रत्येक देशातून एक अधिकृत खेळाडू व 2019च्या स्पर्धेचा विजेता यांनाच स्पर्धेत प्रवेश देण्यात आला होता. पुरुष गटातील 10 खेळाडूंची ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने 9 फेऱयांत खेळविण्यात आली. हिंदुस्थानचा ग्रँडमास्टर सायंतन दास यांच्यानंतर नुबैरशाहला दुसरे मानांकन लाभले होते.


























































