
कराड तालुक्यात सोयाबीन विक्री तेजीत सुरू असल्याचे दिसून येत असून सध्या व्यापारी वर्ग हे प्रतिक्विंटल सोयाबीनला चार हजार रुपये खरेदी दर देत आहेत. दरवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीनला अपेक्षित दर मिळत असल्यामुळे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अतिवृष्टीने सोयाबीनला ठिकठिकाणी मोठा फटका बसला आहे. हातातोंडाला आलेले पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. जे पिक मिळाले त्या सोयाबीनला दर कसा? व किती मिळेल? असा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान सोयाबीनला समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे शासनस्तरावर सुरू आहेत. बाजारपेठेत सोयाबीन खरेदीचा हंगाम मात्र जोरात सुरू आहे. आठवड्यापूर्वी स्थानिक व्यापाऱ्यांकडे प्रति क्विंटलला तीन हजार 400 ते तीन हजार 500 रुपये दर मिळत होता. तोच दर आता चांगल्या प्रतीच्या मालाला प्रति क्विंटलला 4100 रुपये व त्याहून अधिक मिळू लागला आहे. केवळ आठच दिवसांत 500 ते 600 रुपयांनी दरवाढ झाली आहे.
दररोज किमान 100 रुपयांनी प्रति क्विंटलच्या भावात वाढ सुरू आहे. त्यामुळे दराची तेजी आहे. दरवाढीच्या अपेक्षेने बहुतांशी उत्पादकांनी घरात सोयाबीन ठेवले आहे. त्यांना मात्र चांगले दिवस आले आहेत. दराची तेजी राहिल्यास शिल्लक सोयाबीनला आता सोन्याचा भाव मिळत आहे.
पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची मोठी कमतरता जाणवण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी घरी पिकवलेले चांगल्या प्रतवारीचे सोयाबीन बियाणे साठवून ठेवणे गरजेचे आहे, असे कराड तालुका कृषी विभागाकडून सांगण्यात आले.





























































