स्पेसएक्सच्या स्टारशिपचे यशस्वी उड्डाण, मंगळ आणि चंद्र मोहिमांच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

स्पेसएक्सने सोमवारी आपल्या विशाल स्टारशिप रॉकेटची आणखी एक यशस्वी उड्डाण चाचणी पूर्ण केली. या उड्डाणात रॉकेटने अर्ध्या जगाचा प्रवास करत एक मॉक सॅटेलाइट यशस्वीपणे तैनात केले. टेक्सासच्या दक्षिण टोकावरून उड्डाण केलेल्या या रॉकेटने अंतराळातील प्रवासानंतर हिंदी महासागरात नियंत्रित लँडिंग केली. स्पेसएक्सचे संस्थापक आणि सीईओ इलॉन मस्क यांनी या यशस्वी उड्डाणाला मंगळ मोहिमेच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल म्हटलं आहे.

स्पेसएक्सच्या जगातील सर्वात शक्तिशाली ‘स्टारशिप’ रॉकेटने सोमवारी टेक्सासमधील स्टारबेस येथून यशस्वी उड्डाण केले. या उड्डाण चाचणीदरम्यान रॉकेटचा बूस्टर वेगळा होऊन मेक्सिकोच्या आखातात नियंत्रितपणे उतरला, तर अंतराळयानाने अंतराळातील प्रवास पूर्ण करून हिंदी महासागरात लँडिंग केलं. या मिशनमधील कोणतेही घटक परत मिळवले गेले नाहीत, परंतु यशस्वी लँडिंगमुळे स्पेसएक्सच्या भविष्यातील योजनांना बळ मिळाले आहे.

ही स्टारशिपची 11 वी पूर्ण-प्रमाण चाचणी उड्डाण होती. इलॉन मस्क यांनी सांगितलं की, त्यांनी प्रथमच लाँच कंट्रोलच्या बाहेरून हे उड्डाण पाहिले आणि कमाल अनुभव घेतला. मस्क यांच्या मते, स्टारशिप मंगळावर मानवी वसाहत स्थापन करण्याच्या त्यांच्या स्वप्नाचा महत्त्वाचा भाग आहे.

दुसरीकडे नासाला 2030 पर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळवीर उतरवण्यासाठी स्टारशिपची गरज आहे. नासाचे कार्यकारी प्रशासक शॉन डफी यांनी एक्सवर टिप्पणी केली, ‘चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अमेरिकन अंतराळवीर उतरवण्याच्या दिशेनं आणखी एक मोठं पाऊल आहे.’

  • या मिशनमध्ये स्टारशिपने आठ मॉक स्टारलिंक सॅटेलाइट्स वाहून नेले आणि भविष्यातील रीएंट्री प्रक्रियेसाठी विविध युक्त्या तपासल्या. मिशनची वेळ 60 मिनिटांहून अधिक होती. ऑगस्टमधील यशस्वी चाचणी उड्डाणानंतर या वेळीदेखील रॉकेटने समान उद्दिष्टे साध्य केली.
  • स्टारलिंक सिम्युलेटर उपग्रह हे खऱ्या स्टारलिंक उपग्रहांचे बनावट आहेत. त्यांचा वापर स्टारशिपच्या उपग्रह तैनाती क्षमतांची चाचणी घेण्यासाठी केला जातो.
  • स्टारशिपच्या यशस्वी चाचण्यांमुळे मंगळ आणि चंद्र मोहिमांच्या शक्यता अधिक मजबूत झाल्या आहेत. भविष्यातील चाचण्यांमध्ये रॉकेटच्या पुनर्वापरक्षमतेवर लक्ष केंद्रित केले जाईल. त्यामुळे अंतराळ प्रवासाचा खर्च कमी होऊ शकतो.