नित्या आणि निल्या राणेंमध्ये जुंपली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जनता पक्षाचे आमदार व मंत्री नितेश राणे आणि मिंधे गटाचे आमदार असलेले नीलेश राणे या भावांमध्ये चांगलीच जुंपली आहे. नितेश यांनी जाहीर सभेत केलेले वक्तव्य त्याला निमित्त ठरले. त्यावर आक्षेप घेत नीलेश यांनी जरा जपून… अशी तंबी नितेश यांना दिली. त्यानंतरही नितेश यांनी प्रत्युत्तर देत तुम्ही टॅक्स-फ्री आहात असा टोला नीलेश राणेंना उद्देशून मिंधे गटाला लगावला.

कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचले तरी देशात भाजपचे पंतप्रधान आणि राज्यात सगळय़ांचा बाप म्हणून भाजपचाच मुख्यमंत्री बसलाय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा असे धमकी देणारे वक्तव्य नितेश राणे यांनी धाराशीवमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले होते. त्यावर निलेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना समज दिली. नितेशने जरा जपून बोलावे…सगळ्या गोष्टीचे भान ठेवून बोलले पाहिजे, सभेत बोलणे सोप्पं असतं पण त्यामुळे आपण नेमकं कुणाचा फायदा करतोय याचे भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही, असे निलेश राणे यांनी त्यात म्हटले आहे. राणे बंधू दोन वेगवेगळ्या पक्षाचे आमदार आहेत.