
राज्यात उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून येणाऱ्या गावठी कट्टय़ांचा गुन्हेगारीसाठी वापर केला जात असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वच अधिकाऱ्यांना सूचना केल्या असून नाशिक परिक्षेत्रात हा उपद्रव जास्त असल्याने तेथून ही मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांनी दिली आहे.
राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे आरोपीने दोन गावठी कट्टय़ांचा वापर करून कुटुंबास वेठीस धरले होते. त्याच्याकडून हे कट्टे जप्त करण्यात आले आहेत. या घटनेनंतर डॉ. शेखर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत सूचना केल्या. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, तरुण वर्गाला गावठी कट्टय़ांचे जास्त आकर्षण आहे. त्यांच्या हाती हे कट्टे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातून येतात. ठरावीक एजंट त्याची विक्री करतात. गुन्हे करण्यासाठी अलीकडच्या काळात जास्त गावठी कट्टय़ांचा वापर होत आहे. महिनाभरात नाशिक परिक्षेत्रामध्ये 27 गावठी कट्टे जप्त करण्यात आले आहेत.
नगर जिह्यात पाच गावठी कट्टे व तीन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. गावठी कट्टे शोधमोहीम राबविताना मागील पाच वर्षांमध्ये कोणत्या गुन्ह्यात गावठी कट्टय़ांचा वापर झाला याचे रेकॉर्ड काढण्यात येणार आहे. परराज्यांतून येणाऱ्या कट्टय़ांविषयी माहिती हाती लागली असून ते जिल्ह्यात येणार नाहीत, यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जाणार असल्याचे ते म्हणाले.
नाशिक परिक्षेत्रात येणाऱ्या नगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. नागरिकांना आवाहन करून बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती मागविली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यातून महाराष्ट्रात शस्त्रे येतात. तेथे जाऊन कारवाई करणे महाराष्ट्र पोलिसांना शक्य होत नाही. दुर्गम भागातील या ठिकाणांवर जाणे अवघड होते. त्यामुळे जळगावच्या पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली एका खास पथकाची निर्मिती केली आहे. हे पथक तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून परराज्यांतील असे बेकायदा कारखाने शोधून काढणार आहे. त्याचबरोबर परिक्षेत्रात गेल्या पाच वर्षांत बेकायदा शस्त्रांच्या आधारे घडलेल्या गुन्ह्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. नक्याने शस्त्र बाळगणाऱ्यांना पकडण्याची मोहीमही हाती घेण्यात आली आहे. या सर्व माहितीचा वापर करून परराज्यांतून होणारा पुरवठा रोखण्यासाठी ही मोहीम आखल्याचे शेखर यांनी सांगितले.


























































