
अॅड. गिरीश राऊत
ब्राझिलमधील ‘रिओ’ येथे १९९२ मध्ये जागतिक वसुंधरा परिषद झाली. त्यावेळी ठरल्याप्रमाणे पृथ्वीवरील जैविक विविधतेचा चार वर्षे अभ्यास झाला. १९९६ मध्ये आलेल्या अहवालानुसार स्पष्ट झाले की, १०० वर्षांत मानवी विकासाच्या दबावामुळे ५० टक्के मॅन्ग्रोव्ह जंगल नष्ट झाले. त्यानंतरच्या ३० वर्षांत मिळून आतापर्यंत एकूण सुमारे ७५ टक्के मॅन्ग्रोव्ह जंगल नष्ट झाले असा अंदाज आहे. ‘सागरमाला’ हा बंदरांचा प्रकल्प सीआरझेडला निष्प्रभ करून उरलेले जंगल विकासाच्या नावाखाली नष्ट करील.
पृथ्वीवर सुमारे ५० वर्षांपूर्वीपर्यंत किनाऱयापासून फक्त १२० किलोमीटर अंतरापर्यंतच्या पट्टय़ात सुमारे ६० टक्के लोकसंख्या राहत होती. याला कारण होती या क्षेत्राची जीवनाची धारणा करणारी असाधारण क्षमता. हे क्षेत्र महासागर व भूमी यातील दुवा आहे. त्यामुळे येथे भूचर, जलचर व उभयचर हे तिन्ही आविष्कार नांदतात. पृथ्वीवरील सर्वाधिक जैविक उत्पादकता व विविधता येथे असते. या भागात नद्या मोठय़ा प्रमाणात नैसर्गिक गाळ आणतात. मॅन्ग्रोव्हच्या गळणाऱया पानांचे खाद्य मिळते. खाडी, खाजण, पाणथळ जमिनीत एका ग्रॅममधे कोटय़वधींच्या संख्येने असणाऱया जिवाणू व सूक्ष्म जीवांकडून या गाळावर होणाऱया प्रक्रियेशी ती उत्पादकता जोडली होती. त्यातून अनेक स्वरूपातील सजीवांनी समृद्ध अशी पृथ्वीवरील सर्वोत्कृष्ट अन्न साखळी, अन्न जाळे आणि पोषक आहाराची विपुलता व सुलभता तयार झाली. ही जीवनरेखा, हे हिरवे वस्त्र्ा हवे की मृत सीमेंट काँक्रीटचे पांढरे कफन हवे हे ठरविण्याची ही शेवटची संधी आहे.
मॅन्ग्रोव्हचे संरक्षण मिळाल्याने व अन्नाचा सहज पुरवठा होत असल्याने ही मासळीची प्रसूतिगृहे आहेत. गाळ धरून ठेवल्याने पुढील सागरात सूर्यप्रकाश पारदर्शक पाण्यात खोलवर शिरतो. म्हणून तिथे पाण्यात प्रकाशात वाढणारी विलोभनीय रंगीबेरंगी प्रवाळांची सृष्टी असते. मॅन्ग्रोव्ह व प्रवाळ या सागरातील सर्वात महत्त्वाच्या वैशिष्टय़पूर्ण परिसंस्था किनारपट्टीशी निगडित आहेत. उष्ण कटिबंधात पृथ्वीवरील ८० टक्के मासळी आहे. याला भरती-ओहोटी रेषांमधील व त्यालगतच्या या चिंचोळ्या किनारपट्टय़ा कारण आहेत. या भागात भराव झाले तर सागराचा दबाव येऊन इतरत्र भूजलामधे खारट पाणी शिरते.
ब्राझिलमधील ‘रिओ’ येथे १९९२ मध्ये जागतिक वसुंधरा परिषद झाली. त्यावेळी ठरल्याप्रमाणे पृथ्वीवरील जैविक विविधतेचा चार वर्षे अभ्यास झाला. १९९६ मध्ये आलेल्या अहवालानुसार स्पष्ट झाले की, १०० वर्षांत मानवी विकासाच्या दबावामुळे ५० टक्के मॅन्ग्रोव्ह जंगल नष्ट झाले. त्यानंतरच्या ३० वर्षांत मिळून आतापर्यंत एकूण सुमारे ७५ टक्के मॅन्ग्रोव्ह जंगल नष्ट झाले असा अंदाज आहे. ‘सागरमाला’ हा बंदरांचा प्रकल्प सीआरझेडला निष्प्रभ करून उरलेले जंगल विकासाच्या नावाखाली नष्ट करील.
ब्रिटिश काळापासून मूळ सात बेटांच्या मुंबईतील ३२ डोंगर, त्यावरील जंगल व अनेक नद्या नष्ट झाल्या. बेटांमधील सागर व खाडय़ा त्यातील मॅन्ग्रोव्हच्या जंगलासह गाडण्यात आल्या.
स्वातंत्र्य मिळाले तरी नोकरशाहीच्या विकासविषयक कल्पनांचा ढाचा तोच राहिला. १९४८ सालात पाणथळ जमिनी सुधारणा व खार जमिनी विकास मंडळे या सरकारी यंत्रणा तयार करण्यात आल्या. खाडय़ा, खाजणे, नदीमुखे भरावाखाली गाडण्याचा ब्रिटिशांचा कार्यक्रम आता विकासाचा राष्ट्रीय मान्यताप्राप्त प्रवाह म्हणून अधिकारी व अभियंत्यांकडून अधिक उत्साहाने चालू राहिला. या पाणथळ क्षेत्राचा सागराशी जोडलेला भाग निसर्गतः अरुंद असतो. त्याचा (गैर)फायदा घेऊन तोडलेल्या डोंगरांचे दगड व माती या भागात भरून सागराच्या भरत्या अडवून आतील क्षेत्रातील जीवनाची उपासमार करून तो भाग गाडायचा. या पद्धतीने वैतरणा नदीमुखातील ‘दातिवरे’ गावालगतच्या आणि तसाच महाराष्ट्रात अनेक खाडय़ांच्या उत्कृष्ट सागरी परिसंस्थांचा विनाश केला गेला. हा ‘खाडय़ांची मुखबंदी’ या नावाने ओळखला जाणारा सरकारी कार्यक्रम सागराची नसबंदी ठरला. सीआरझेड आल्यावरही एकाच वेळी रक्षण करणे व विकासाच्या नावे विनाश करणे ही विसंगती चालू आहे. खाडय़ांचे, खाजणांचे व नदीमुखांचे क्षेत्र निरुपयोगी, वाया गेलेले असून भराव करून उद्योग, व्यापार व निवासी वापरासाठी ते उपलब्ध करून घेणे म्हणजे विकास करणे असे मानले गेले. मुंबई महानगर क्षेत्राची पालक संस्था असलेल्या एमएमआरडीएचा अहवाल खाजणांना ‘वाया गेलेली जमीन’ म्हणतो. ( wetland is wasteland ) हे पाश्चात्त्यांनी औद्योगिकीकरणासाठी आणलेल्या शिक्षणाने ठसवलेले अज्ञान आहे. नदी, सागर बुजवणे, डोंगर तोडणे हा या यंत्रणांचा आवडता कार्यक्रम राहिला आहे.
यामुळे सवाशे वर्षांपूर्वीच्या राजपत्रातील नोंदीप्रमाणे २५ अंश सेल्सियसपर्यंत जाणारे मुंबईतील उच्चतम तापमान आता ४५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचते. याशिवाय मुंबईच्या विकासाच्या प्रक्रियेत पूर्ण देशातील निसर्गाचा प्रचंड विनाश झाला व आजही चालू आहे.
येथे समुद्रसान्निध्यामुळे सुखद तापमान व हवामान मिळाले होते. मॅन्ग्रोव्हचे जंगल, सुनामी व चक्रीवादळांपासुन संरक्षण करीत होते. अतिवृष्टीला सामावून घेत होते. विकासामुळे आपण हे सर्व गमावले आहे.
कोटय़वधी वर्षांत उक्रांतीच्या प्रक्रियेत तयार झालेल्या या अद्भुत सृष्टीवर अलीकडे दोन-अडीच शतकांत जगभर औद्योगिकीकरण व शहरीकरणाचा आघात सुरू झाला. आधुनिक मुंबईच्या या विध्वंसक जीवन पद्धतीपासून जीवनाची ही क्षमता, हे वरदान वाचवण्यासाठी गेल्या काही दशकांपासून प्रयत्न सुरू झाले.
























































