
सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत संयुक्त समिती स्थापन करावी जेणेकरून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विभागनिहाय आढावा घेऊन निर्णय घेणे सोपे होईल, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ठाकरे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेऊन आपल्या मागण्या सादर केल्या. या शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टांक, प्रदेशाध्यक्ष जयसिंग कछवा यांचा समावेश होता.
सफाई कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन करण्यात येणाऱया या समितीत संघटनेचे पदाधिकारी तसेच संबंधित विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱयांचा समावेश करावा. या समितीने प्रलंबित प्रश्न, अडचणींचा आढावा घेऊन ते सोडवण्यासाठी पर्याय द्यावेत व शिफारशी कराव्यात. ज्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे शक्य आहे ते मार्गी लावण्याचे प्रस्ताव तसेच पर्यायही सादर करावेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या बैठकीला मुख्य सचिव सीताराम पुंटे, सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक उपस्थित होते.

























































