शिवसैनिकांसाठी खास ड्रेसकोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अयोध्या

मुंबई-महाराष्ट्रातून शिवसैनिकांचे जत्थेच्या जत्थे ट्रेन-बसमधून अयोध्येच्या दिशेने रवाना झाले. प्रत्येक शिवसैनिकाला एक ड्रेसकोड देण्यात आला आहे. ‘चलो अयोध्या’चा नारा देत निघालेला शिवसैनिक ओळखता यावा यासाठी हा ड्रेसकोड तयार करण्यात आल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. पांढऱया रंगाच्या टी शर्टवर श्रीरामाची प्रतिमा छापण्यात आली आहे. खालच्या बाजूला ‘चलो अयोध्या’चा बुलंद नारा छापण्यात आला आहे. मागच्या बाजूस हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र आहे. आपापल्या जिह्याचे नावही छापण्यात आले आहे. टोपीही देण्यात आली आहे. या टोपीवर एका बाजूला जिह्याचे नाव तर दुसऱ्या बाजूला ‘जय श्रीराम’ छापण्यात आले आहे.

व्यापाऱ्यांचाही पाठिंबा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला अयोध्येतील व्यापाऱ्यांनीही पाठिंबा दिला आहे. फैजाबादचे संयुक्त व्यापारी मंडळ उद्धव ठाकरे यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. व्यापाऱ्यांमध्येही प्रचंड उत्साह असून अयोध्येतील कार्यक्रमासाठी त्यांनीही जोरदार तयारी केली आहे.