
प्रयागराजच्या माघ मेळ्यात सरकारविरोधात शंख फुकणारे शंकराचार्य स्वामी अविमुत्तेश्वरानंद हे कायद्याच्या कचाटय़ात अडकण्याची चिन्हे आहेत. प्रयागराज येथील विशेष पोक्सो न्यायालयाने लैंगिक शोषण प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. अविमुत्तेश्वरानंद यांचे शिष्य स्वामी मुपुंदानंद गिरी यांच्यावरही कारवाई होणार आहे.
शापंभरी पीठाधीश्वर अशुतोष ब्रह्मचारी महाराजांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. अविमुत्तेश्वरानंद यांच्याशी संबंधित आश्रमात अल्पवयीन मुलांचे यौन शोषण झाल्याचा आरोप आहे. पीडित मुलांचे जबाब 13 फेब्रुवारी रोजी नोंदवण्यात आले होते. यासंदर्भातील पोलिसांच्या अहवालाचीही दखल घेण्यात आली होती. सुनावणीनंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता. आता कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असे न्यायालयाने बजावले आहे.
सर्वसामान्य लोकांप्रमाणे मी न्यायालयीन प्रक्रियेला सामोरा जाईन. माझ्यावरचा खटला काढून घ्या असं सांगायला मी योगी आदित्यनाथ नाही. माझा न्यायालयावर विश्वास आहे.
अविमुत्तेश्वरानंद काय म्हणाले?
न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे स्वामी अविमुत्तेश्वरानंद यांनी स्वागत केले. ’चौकशीची प्रक्रिया सुरू होण्यासाठी गुन्हा दाखल होणे गरजेचे होते. त्यानंतरच आमच्यावर करण्यात आलेल्या आरोपांतील सत्य समोर येईल आणि खोटे आरोप करणाऱ्यांना शिक्षा होईल. आमच्यावर आरोप करणारे स्वतः गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळे जे खोटे आहे, ते खोटेच ठरणार आहे. त्यामुळे चौकशी प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल हे न्यायालयाने पाहावे,’ असे अविमुत्तेश्वरानंद म्हणाले.































































