
मुंबईत होणाऱया विकासकामांसाठी आवश्यकतेनुसार वेळोवेळी निधी उपलब्ध करण्याची तरतूद असताना ‘विशेष प्रकल्प निधी’ उभारण्याची गरजच काय?’ असा सवाल करीत आज स्थायी समितीने 4 हजार कोटींचा ‘विशेष प्रकल्प निधी’चा उभारण्याचा प्रस्ताव रोखून ठेवला. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ही माहिती दिली. पालिकेच्या 80 हजार कोटींच्या ठेवीतून हा ‘विशेष प्रकल्प निधी’ उभारण्याचा पालिका प्रशासनाचा प्रस्ताव आहे.
पालिकेने पुलांची बांधणी, नवीन पाणी प्रकल्प उभारणे, मिठी नदी अन्य नद्यांची कामे, नाल्यांची सफाई, बांधणी करणे, पूरस्थिती रोखण्यासाठी उपाययोजना करणे आदी विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तब्बल 7 हजार 884 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. कोरोनाच्या कालावधीत या महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे रखडल्यास हे विविध प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे. यासाठी पालिकेने नव्याने स्वतंत्र निधीची उभारणी करण्यासाठी ‘दीर्घकालीन आर्थिक धोरण’ तयार करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी ‘विशेष प्रकल्प निधी’ निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थायी समितीने स्पष्टीकरण मागवले
पालिकेच्या कोणत्याही मोठय़ा प्रकल्पांसाठी आवश्यक निधीची कमतरता भासल्यास स्थायी समिती निधीची व्यवस्था करून देते. एका खात्याचा निधी दुसऱया आवश्यक कामासाठी त्या त्या खात्यात वळविण्यात येतो. असे असताना पालिकेने सदर प्रकल्पांसाठी ‘प्रकल्प निधी’ च्या नावाखाली वेगळा ‘हेड’ का ओपन केला, असा सवाल स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला. त्यामुळे पालिका प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण द्यावे असे निर्देशही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.





























































