नवरात्रीत वैष्णौदेवीभक्तांना मिळणार 24 तास भोजन, जलपान आणि बॅटरी कार सेवा

633

देशातील करोडो देवीभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कटराच्या माता वैष्णोदेवी देवस्थानने यंदा शारदीय नवरात्रादरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांसाठी काही सुविधा 24 तास पुरविण्याची घोषणा केली आहे. या सुविधांत बॅटरी कार, भोजन ,उपवासाचे खानपान आणि जलपान या सेवा नवरात्र काळात भक्तांना दिवस-रात्र पुरविण्याचे देवस्थानने ठरवले आहे. विशेष म्हणजे या सेवांचा सर्वाधिक लाभ वैष्णोदेवी मातेच्या दिव्यांग, वयोवृद्ध आणि आजारी भक्तांना होणार आहे. असे भक्त आपल्या दाखल्यांचे प्रगटीकरण वैष्णोदेवी श्राईन बोर्डाच्या निहारिका संकुलातील केंद्रीय कार्यालयात करून हेलिकॉप्टरसेवेचाही लाभ घेऊ शकतील असे बोर्डाचे सीईओ सिमरनदीप सिंह यांनी जाहीर केले आहे.

 यंदा शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात वैष्णोदेवी मातेच्या दर्शनासाठी देश -विदेशातून 3 लाखांहून अधिक भाविक वैष्णोदेवी मंदिराला भेट देण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या सर्व भक्तांना विशेष सेवा -सुविधा पुरवण्याचा निर्णय श्राईन बोर्डाने घेतला आहे. भक्तांसाठी 24 तास भोजनालये ,जलपान केंद्रे आणि  मोफत भोजनाचे लंगर चालविण्यात येणार आहेत. शिवाय दिव्यांग ,वयोवृद्ध आणि आजारी भक्तांनी त्यांच्या परिस्थितीबाबतची कागदपत्रे सादर केल्यास त्यांना हेलिकॉप्टर ,बॅटरी कार  तात्काळ सेवेचा लाभ घेता येणार आहे. बोर्डाने जागोजागी शुद्ध पाण्याची व्यवस्था दर्शन मार्गात जागोजागी केली आहे. 29 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या नवरात्राच्या काळात दर्शनाला येणाऱ्या वैष्णोदेवी भक्तांना पाणी ,भोजन ,वीज आणि प्रवासाची सुलभ सेवा 24 तास देण्यासाठी वैष्णोदेवी श्राईन बोर्डाने आतापासूनच सज्जता ठेवली आहे.

बोर्डाच्या सफाई कर्मचाऱ्यांना एक आठवड्याचे अतिरिक्त वेतन

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नुकताच वैष्णोदेवी श्राईन बोर्डाला शुद्ध पेयजल आणि स्वच्छतेसाठीचा सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने जम्मू-कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी देवस्थानच्या सफाई कर्मचाऱ्यांना एक आठवड्याचे अतिरिक्त वेतन देऊन गौरवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना भविष्यात आपल्या कामासाठी अधिक हुरूप येईल आणि ते भक्तांची आणखी चांगली सेवा करतील अशी माहिती वैष्णोदेवी श्राईन बोर्डाचे सीईओ सिमरनदीप सिंह यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या