
अंधेरी येथे स्पेक्ट्रम वर्ल्ड हे नवे कलादालन सुरू झाले आहे. दहा प्रख्यात कलावंतांच्या चित्र-शिल्पाकृतींच्या प्रदर्शनाने आज कलादालनाचा शुभारंभ झाला.
आर्टिवल फाउंडेशनने आयोजित केलेले सामूहिक कलाप्रदर्शन स्पेक्ट्रम वर्ल्ड, बी-119 लक्ष्मी बिझनेस पार्क, लक्ष्मी इंडस्ट्रिअल इस्टेट, अंधेरी पश्चिम येथे 29 एप्रिल ते 2 मे या कालावधीत सुरू राहणार आहे. प्रदर्शनात प्रकाश घाडगे, प्रदीप सरकार, रतन साहा, भिवा पुणेकर, गौतम मुखर्जी, आनंद पांचाळ, शशिकांत धोत्रे, एच.आर. दास, अशोक राठोड व नीलेश निकम या कलावंतांच्या कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत या कलाकृती विनामूल्य बघता येतील.
प्रदर्शनाचे आयोजन शरद गुरव व सतीश पाटील यांनी केले आहे. आर्टिवल फाउंडेशनने याआधीही काही प्रदर्शने भरवलेली आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील लपलेल्या प्रतिभेचा शोध घेणे आणि त्यांना – त्यांच्या कलाकृतींना ज्येष्ठ आणि प्रथितयश कलाकारांसह कलादालनात प्रदर्शित करण्याची संधी देऊन प्रोत्साहन देणे हे आर्टिवल फाउंडेशनचे उद्दिष्टय़ आहे.































































