स्पाइसजेटची हेल्पलाईन विस्कळीत; पर्यायी माध्यमांचा वापर करण्याचे एअरलाइन्सचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

आखाती देशांतील वाढत्या तणावामुळे उड्डाण सेवेसंदर्भात प्रवाशांकडून विचारणा होत आहे. प्रवासी या सेवांवर अधिकाधिक अवलंबून असतानाच, स्पाइसजेटच्या मुख्य ग्राहक सेवा हेल्पलाइनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कनेक्टिव्हिटीची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे प्रवाशांनी पर्यायी क्रमांक आणि माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन एअरलाइन्सने केले आहे.

मुख्य हेल्पलाईन बंद असल्याने प्रवासी आता +91 (0)124 7101600 या क्रमांकावर किंवा एअरलाईन्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर चौकशी करू शकतात. तांत्रिक टीम ही समस्या सोडवण्यासाठी काम करत आहे; मात्र, ही सेवा पूर्ववत होण्यासाठी किती वेळ लागेल, याबाबत कोणतीही निश्चित सांगता येणार नाही, असे एअरलाइनने पुढे सांगितले.

दरम्यान, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसने मंगळवारी पश्चिम आशियासाठी 24 नियोजित आणि विशेष विमानांची घोषणा केली आहे. यामध्ये जेद्दाह आणि मस्कत सारख्या शहरांचा समावेश आहे. युएई (UAE) साठीची उड्डाणे नियामक मंजुरीवर अवलंबून असतील. मात्र विमानतळावर निघण्यापूर्वी आपल्या विमानाची सद्यस्थिती अधिकृत वेबसाईटवर तपासून घ्यावी, असे आवाहन सर्व एअरलाईन्सकडून करण्यात आले आहे.