दुबईला जाणारे विमान 10 तास मुंबईतच रखडले, संतप्त प्रवाशांची विमानतळावर निदर्शने

दुबईला जाणारे विमान रात्रभर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रखडले. उड्डाणाला तब्बल दहा तासांहून अधिक काळ विलंब झाल्याने संतप्त प्रवाशांनी विमानतळ परिसरातच ‘स्पाईसजेट’विरोधात निदर्शने केली. ‘स्पाईसजेट चोर है’च्या घोषणा देत प्रवाशांनी केलेल्या निदर्शनामुळे गोंधळ उडाला. तांत्रिक कारणामुळे विमान उड्डाण झाल्याचे एअरलाईन्सकडून सांगण्यात आले.

स्पाईसजेटचे दुबईला जाणारे विमान मध्यरात्री 1 वाजून 50 मिनिटांनी टेक ऑफ घेणार होते. मात्र तांत्रिक कारणामुळे ते विमान संपूर्ण रात्रभर मुंबई विमानतळावरच उभे करून ठेवण्यात आले. काही तास उलटल्यानंतर प्रवाशांना उड्डाणाच्या स्थितीबाबत अधिक माहिती देणे बंद करण्यात आले. त्यामुळे उड्डाण रद्द केले की काय? असा संभ्रम निर्माण झाला. उड्डाण रद्द केल्याची घोषणा न करताच स्पाईस जेट एअरलाईन्सने प्रवाशांना रात्रभर ताटकळत बसायला भाग पाडले. तब्बल 10 तास उलटल्यानंतरही प्रवाशांना कुठलीही सूचना दिली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी टर्मिनल परिसरातच जोरजोराने निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.