उपवास – देवीआईचे सान्निध्य

 आपण उपवास का करतो.. आपल्या इष्ट देवतेचा सहवास, तिची कृपा आपल्याला मिळावी म्हणून.. नवरात्रीच्या काळात उपवास केल्यास मन आणि शरीर शुद्ध होते. मानस नवचेतना.. उर्जा मिळते. एकाग्रता वाढते. आयुर्वेदानुसार उपवासामुळे आपला जठराग्नी शुद्ध होऊन पुन्हा प्रदीप्त आणि प्रज्वलित होतो. हा उपवास आपल्या शरीरातील टाकाऊ घटक बाहेर टाकण्यास मदत करतो. त्यामुळे सुस्ती, मांद्यत्व कमी होते. शरीरात नवचैतन्य जागृत होते. जेव्हा शरीर शुद्ध होते तेव्हा मनही सकारात्मक विचार करू लागते. आपल्यापैकी बरेचजण भूक लागण्याची वाट पाहतच नाहीत. भूक लागणे म्हणजे आपले शरीर अन्न पचविण्यासाठी सज्ज असण्याचा संकेत. पण भूक लागण्यापूर्वी खाल्ल्याने आपली पचनप्रणाली अजूनच दुबळी होते. यातून रोगप्रतिकार शक्ती मंदावते. पण उपवासाने आपला जठराग्नी प्रदीप्त होत असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. नवरात्रीचा काळ हा स्वत:सोबत घालविण्याचा, ध्यानाचा आहे. उपवासामुळे मनाची अस्वस्थता कमी होते. आवश्यक तेवढ्या उर्जेसाठी पुरेसा फलाहार आणि सात्विक अन्नाचे सेवन करणे गरजेचे आहे.

 उपवास आणि ध्यान केल्याने आपल्यातील सत्व वाढते. सत्व म्हणजे आपल्यातील शांती आणि प्रसन्नता. सात्विक उर्जेत वाढ झाल्याने मन अधिक शांत आणि सजग होते. परिणामी आपले संकल्प आणि प्रार्थनेला सात्विकतेचे बळ मिळते. आपण अधिक कार्यक्षम होतो. त्यामुळे आपली कार्ये सहज सिद्धीस जातात.

नवरात्रीतील उपवासासाठी काही आहार पद्धती –

  • नवरात्री दिवस १ ते ३ – फलाहार करावा. सफरचंद, केली, चिकू, पपई अशी गोड कर्बोदकयुक्त फळे आहारात ठेवा. याखेरीज दोन आहाराच्यामध्ये दुधीचा रस, शहाळे घ्यावे.
  • दिवस ४ ते ६ – हे तीन दिवस फळांचे रस, दुध, ताक, दही आणि वरी, शिंगाडे, शेंगदाणे, राजगिरा अशा उपवासी पदार्थांचा आहारात समावेश करा.
  • दिवस ७ ते ९ – माफक प्रमाणात कर्बोदकांचा आहारात समावेश करावा. साबुदाण्याची लापशी, राजगिरा भाकरी, बटाट्याची भाजी, दही ताक
  • स्वयंपाकात नेहमी खडे मीठ वापरा. रताळे, बटाटे उकडून अथवा भाजून खा. अति प्रमाणात आहार घेणे टाळा.