वेटलिफ्टिंगला ‘बळ’ मिळण्यासाठी हवीय प्रायोजकाची साथ, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष संजय मिसर यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेटलिफ्टिंग हा खेळ महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये झेप घेऊ पाहतोय. पण या खेळासाठी लागणाऱया साधनांना (बारबेलसह इत्यादी) सात ते आठ लाखांपर्यंत खर्च येतो. खेळाडूंना डाएट व फिटनेससाठीही वेगळा खर्च करावा लागतो. या खेळाला स्पॉन्सरची (प्रायोजक) कमी जाणवते. ऑलिम्पिकमध्ये सहभागी नसलेल्या खेळांनाही स्पॉन्सर मिळतात, पण आम्हाला मिळत नाहीत ही खेदजनक बाब. पण कदाचित या खेळाचे मार्केटिंग करण्यात आम्हीही कमी पडलो असू. पण यापुढे असे व्हायला नको यासाठी नक्कीच प्रयत्न करू, असा विश्वास महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष संजय मिसर यांनी दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान व्यक्त केला. तसेच या खेळाला प्रायोजक मिळावे यासाठीही त्यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.

आता खेळ बहरतोय

सुरुवातीला वेटलिफ्टिंग हा खेळ मर्यादित ठिकाणी खेळला जात होता. मुंबई, ठाणे, सांगली, कोल्हापूर व पुणे या पाच शहरांमध्येच हा खेळ प्रामुख्याने खेळला जात असे. पण कालांतराने वेटलिफ्टिंगची ‘पॉवर’ इतर जिह्यांमध्येही वाढू लागली आहे. आता तर जळगाव, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, नागपूर, सातारा येथेही मोठय़ा प्रमाणात हा खेळला जात आहे, असे स्पष्ट मत संजय मिसर यांनी यावेळी व्यक्त केले.

पंच, रेफ्री, कोचेससाठी ऑनलाइन मार्गदर्शन

कोरोना व लॉकडाऊनच्या काळात आमच्याकडून पंच, रेफ्री व कोचेससाठी ऑनलाइन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर सलग तीन दिवस रंगले. या खेळाबाबत ऑनलाइन जास्त काही सांगू शकत नाही. प्रत्यक्षात खेळतानाच मार्गदर्शन करता येते. त्यामुळे खेळाडूंसाठी शिबीर ठेवण्यात आले नाही, असेही संजय मिसर यावेळी आवर्जून सांगतात.

सप्टेंबर महिन्यापासून खेळ सुरू व्हायला हरकत नाही

वेटलिफ्टिंग हा तसा बॉडी कॉण्टॅक्ट खेळ नाही, पण या खेळातील एकच उपकरणे सर्व खेळाडू वापरत असतात. त्यामुळे थोडी अडचण निर्माण होऊ शकते. पण जिम सुरू झाल्यास आमचे खेळाडू तिथे जाऊन ट्रेनिंग करू शकतील. तसेच सप्टेंबर महिन्यापासून या खेळाच्या सरावाला सुरुवात व्हायला हरकत नाही, असेही संजय मिसर यांना वाटते.

पदक विजेते खेळाडू, दर्जेदार प्रशिक्षक अन् आंतरराष्ट्रीय पंच

वेटलिफ्टिंग या खेळामधून महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू, दर्जेदार प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय पंच मिळाले आहेत. नानासाहेब सिंहासने यांनीही या खेळाच्या विकासासाठी मेहनत केलीय. ओंकार ओतारी, चंद्रकांत माळी, निकिता काळे, तृप्ती माने, मुकुंद आहेर, गणेश माळी, सौम्या दळवी, हर्षद वाडेकर, रूपा हनगंडी, अनन्या पाटील या खेळाडूंनी महाराष्ट्राचा झेंडा दिमाखात फडकत ठेवलाय. अनिल माहुली, संतोष सिंहासने, प्रदीप पाटील, प्रवीण व्यवहारे, योगेश महाजन, मधुरा सिंहासने, उज्ज्वला माने, राजेश कामथे व शिरीष रुमडे या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यावेळी खेळाडूंचा लाभत आहे. तसेच शशी जोशी, प्रमोद चोळकर, प्रशांत बेंद्रे, सरला शेट्टी, सुरेश कुंभार, मिलिंद कुलकर्णी व राजेश शर्मा हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पंच म्हणून चोख काम पार पाडत आहेत, अशा शब्दांत संजय मिसर यांनी खेळाडू, प्रशिक्षक व पंचांचे कौतुक केले.