
हिंदुस्थानी संघाचा माजी फलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू रॉबिन उथप्पाच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. तो दुसऱ्यांचा पिता झाला असून पत्नी शीतल रॉबिनने मुलीला जन्म दिला आहे. उथप्पाने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत माहिती दिली आहे.
उथप्पाने गुरुवारी संपूर्ण कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये उथप्पाच्या हातात ही चिमुकली दिसत आहे. यावेळी त्याच्यासोबत पत्नी आणि त्याचा मुलगाही दिसत आहे. रॉबिन उथप्पाने आपल्या या छोट्या परीचे नाव ट्रिनिटी थिया उथप्पा असे ठेवले आहे.
आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सलामीच्या या फलंदाजाने आपल्या मुलीची ओळख करुन देताना लिहिले की, ”भरलेल्या अंतःकरणासह आम्ही आमच्या नव्या सदस्याची ओळख करुन देऊ इच्छित आहोत. माझी मुलगी ट्रिनिटी थिया उथप्पा हिली भेटा. या जगात येण्यासाठी तू आम्हाला पालक आणि भाऊ म्हणून निवडलेस यासाठी आभारी आहोत”. अशी फोटोओळ दिली आहे.
View this post on Instagram
रॉबिन उथप्पाने आपली प्रेयसी शीतल हिच्यासोबत अनेक वर्षांच्या नात्यानंतर 2015 साली लग्न केले. रॉबिन ख्रिश्चन असून शीतल हिंदू आहे. सुरुवातील वेगवेगळ्या धर्मातील असल्यामुळे घरातून विरोध होता मात्र दोघांनी आपल्या घरच्यांना या लग्नासाठी तयार केले. रॉबिन आणि शीतल यांची एकमकांसोबत चांगली मैत्री होती. त्यानंतर मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि 2015 साली लग्न केले. 2017 मध्ये या जोडप्याला नील नोलन उथप्पा हे पहिले अपत्य झाले.



























































