स्क्वॉशमध्ये सुवर्णक्रांती! हिंदुस्थान पहिल्यांदाच जगज्जेता हाँगकाँग चीनला 3-0ने नमवले

यजमान हिंदुस्थानने रविवारी स्क्वॉश वर्ल्ड कपमध्ये सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा इतिहास रचला. अंतिम सामन्यात हाँगकाँगचा 3-0 असा एकतर्फी पराभव करीत हिंदुस्थानने प्रथमच स्क्वॉश वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले. या विजयासह स्क्वॉश वर्ल्ड कप जिंकणारा हिंदुस्थान हा आशियातील पहिला देश ठरला हे विशेष! याआधी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि इजिप्त या दिग्गज देशांनाच हा मान मिळाला होता.

चेन्नईतील एक्सप्रेस अव्हेन्यू मॉल येथे रंगलेल्या अंतिम लढतीत हिंदुस्थानच्या खेळाडूंनी प्रचंड आत्मविश्वास आणि परिपक्व खेळाचे दर्शन घडवले. 17 वर्षीय अनाहत सिंगने निर्णायक सामना जिंकत हिंदुस्थानच्या ऐतिहासिक विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. 2023 मध्ये कांस्यपदकावर समाधान मानावे लागलेल्या हिंदुस्थानसाठी हा पहिलाच वर्ल्ड कप किताब ठरला. अंतिम सामन्याची सुरुवात अनुभवी जोशना चिनप्पाने केली. महिलांच्या एकेरीत तिने जागतिक क्रमवारीत 37व्या स्थानी असलेल्या ली का यी हिचा 3-1 (7-3, 2-7, 7-5, 7-1) असा पराभव करत हिंदुस्थानला दमदार आघाडी मिळवून दिली. त्यानंतर हिंदुस्थानचा सर्वोच्च मानांकित पुरुष खेळाडू अभय सिंगने अॅलेक्स लाउचा 3-0 (7-1, 7-4, 7-4) असा सरळ पराभव करीत आघाडी 2-0 अशी वाढवली.

विजेतेपद निश्चित करण्यासाठी मैदानात उतरलेल्या अनाहत सिंगने तणावाच्या क्षणांतही आपली परिपक्वता सिद्ध केली. जागतिक क्रमवारीत 31व्या स्थानी असलेल्या टोमॅटो हो हिच्याविरुद्ध अनाहतने 3-0 (7-2, 7-2, 7-5) असा निर्विवाद विजय मिळवला. त्यामुळे पुरुष एकेरीतील राष्ट्रीय विजेता वेलावन सेंथिलकुमारला मैदानात उतरवण्याची गरजच उरली नाही.

दुसऱया मानांकनाचा हिंदुस्थानी संघ संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता विजेतेपदापर्यंत पोहोचला. गट फेरीत स्वित्झर्लंड आणि ब्राझील यांना 4-0 असे पराभूत केल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण आफ्रिकेला, तर उपांत्य फेरीत दोन वेळच्या विजेत्या इजिप्तला 3-0 असे नमवून हिंदुस्थानने अंतिम फेरी गाठली.