श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तानमुळे कांदा निर्यातीवर परिणाम!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
onion-5

पूर्वी कांदा महाराष्ट्रातील विशेषतः नगर, नाशिक या जिह्यांमध्ये पिकवला जायचा. आता मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हिमालयाच्या पायथ्यापर्यंत शेतकरी कांदा पिकवू लागले आहेत. श्रीलंका आणि बांगलादेश हे महाराष्ट्राचे प्रमुख निर्यात बाजार होते. गेल्या चार-पाच वर्षांत या देशांनी स्वतः कांदा पिकवायला सुरुवात केली आहे. तसेच पाकिस्तानने चिनी कांदा बाजारात आणल्याने आपल्या निर्यातीवर याचा परिणाम झाल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेमध्ये दिली.

शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी चांदवड येथील शेतकऱ्यांच्या उपोषणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्री रावल म्हणाले, गेल्या काही वर्षांत कांदा निर्यातीत अडचणी येत होत्या. परंतु, मॉरिशसच्या हाय कमिशनर यांच्यासोबत महाराष्ट्रातील कांदा मॉरिशसला पाठविण्याबाबत चर्चा झाली आहे. केंद्राच्या मदतीने महाराष्ट्रातील सुमारे 1 लाख टनांहून अधिक कांदा निर्यात करून मॉरिशसची मोठ्या प्रमाणातील कांद्याची गरज पूर्ण करण्यात येणार आहे.

केंद्राकडून मे-जूनमध्ये कांदा खरेदी केली जाते. हा कालावधी चुकीचा असून मार्च-एप्रिलमध्येच खरेदी होणे आवश्यक आहे. त्यामुळे मार्चमध्ये 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याबाबत केंद्राला पत्र दिले आहे. तसेच, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजनांवर काम सुरू असल्याची माहितीही मंत्री रावल यांनी दिली.